मालवाहतूक संघटनांचा संप गंभीर; आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी
मुंबई :- राज्यातील मालवाहतूक संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जुलैपासून संप पुकारल्याने संपूर्ण राज्यात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी ठाम मागणी केली. मालवाहतूकदार संघटनांनी यावेळी विविध समस्या आणि अन्यायकारक दंडात्मक कारवायांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
अन्यायकारक दंड वसुली थांबली पाहिजे, या पूर्वी ई चलनद्वारे लावलेला सर्व दंड माफ करणे, ई चलन बाबत शासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेणे इत्यादी वाहतूक संघटनाच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात संघटना आग्रही असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत दिली आहे.
तसेच हा संप जर काही दिवस चालला तर फार मोठी अडचण होईल, JNPT मध्ये मालवाहतूक गाड्या लावायला अधिकृत जागा नाही, रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतात अशा अन्यायकारक कारवाईला रोखले पाहिजे असेही आमदार काशिनाथ दाते सर यांनी म्हणणे मांडले.
तसेच ही बाब शासनाने विधासभा अध्यक्षांच्यामार्फत गांभीर्याने घ्यावी अशी मागणी आमदार काशिनाथ दाते सर यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली आहे. तसेच शासनाने या संपाबाबत तातडीने बैठक घ्यावी व यावर तात्काळ निर्णय घ्यावा व मालवाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप थांबला पाहिजे अशी मागणीही आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधासभेत केली आहे.