पारनेर तहसीलदारांना तात्काळ निलंबित करा – टाकळी ढोकेश्वर रस्ता रोको आंदोलन

On: Tuesday, January 6, 2026 3:02 PM
---Advertisement---

सुजित झावरे पाटील यांचा संतप्त इशारा

“आता शांत बसणार नाही, वाळूचे डंपर रस्त्यात पेटवू” प्रशासनाला आंदोलकांचे थेट आव्हान

पारनेर :- पारनेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि भरधाव डंपरांच्या दहशतीमुळे आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी गेला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुका संतप्त झाला आहे. मांडओहळ परिसरातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीने पुन्हा एकदा रक्तरंजित रूप धारण केले आहे. रविवारी (४ जानेवारी २०२६) सकाळी साडेसातच्या सुमारास मांडओहळ नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने बोकनकवाडी ते वासुंदे रस्त्यावर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संतोष नऱ्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात इतका भीषण होता की दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले असून परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र हा अपघात नसून, प्रशासनाच्या बेजबाबदारपणातून झालेला थेट खून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवैध धंद्यात वाळू माफियांचा समावेश असून त्यांना प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याची भावना परिसरात आहे. संतोष नऱ्हे यांचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेला खून असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेना नेते व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी प्रशासनावर जोरदार आगपाखड करताना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,

“पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातून आता एकही खडा वाळू उचलू देणार नाही. प्रशासनाने डोळे उघडले नाहीत तर वाळूचे डंपर भर रस्त्यात पेटवले जातील. आता कायदा हातात घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.”

मांडओहळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन आणि डंपरांची बेधडक वाहतूक सुरू असून, यामुळे सातत्याने अपघात घडत आहेत. तरीही महसूल आणि पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाळू माफियांना प्रशासनाचे अभय मिळाले असून, अधिकारी आणि गुन्हेगार यांची मिलीभगत उघडपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलकांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या :

🔴 मांडओहळ परिसरातील अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावे

🔴 वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करावेत

🔴 अपघातातील डंपर चालक व मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करावा

🔴 महसूल व पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी

🔴 पारनेर तहसीलदारांना तात्काळ निलंबित करावे

यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तहसील कार्यालयात होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबाबत तक्रारी मांडल्या. तहसीलदार जनतेवर माज दाखवत असल्याचा आरोप करत त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. तहसीलदार जनतेशी अरेरावीने वागत असून, लोकसेवकाऐवजी माज दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला. अशा अधिकाऱ्यांना पदावर ठेवण्याचा अधिकार सरकारला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.रस्ता रोको आंदोलनामुळे अहिल्यानगर-कल्याण मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मात्र आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले. पोलिस व महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, अवैध वाळू वाहतुकीमुळे आणखी एकाही नागरिकाचा बळी गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल. परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवत अवैध वाळू धंद्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मात्र आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत अंतिम इशारा दिला आहे की,

“जर अवैध वाळू वाहतुकीमुळे आणखी एकाही नागरिकाचा जीव गेला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

या आंदोलनात सुजित झावरे पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते कारभारी आहेर, शिवसेना नेते संदीप कपाळे, उद्योजक संदीप रोहकले, उपसरपंच माऊली वरखडे, अमोल साळवे, मारुती रोहकले, सरपंच विमल झावरे, शंकर बर्वे, संतोष शेलार, भगवान वाळुंज, भाऊ सैद, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, शरद पाटील, महादू भालेकर, सूर्यभान भालेकर, विठ्ठल झावरे, बापूसाहेब गायखे, संतोष ढोकळे, शिवाजी रोकडे, सचिन सैद, संजय भोर, पप्पू कासुटे, इंजि. प्रसाद झावरे, इंजि. निकील झावरे, स्वप्नील झावरे, गणेश शिरतार, अशोक भालेकर, संग्राम झावरे, कैलास भालेकर, साहेबराव गुंजाळ, लक्ष्मण झावरे, नारायण झावरे, महेश झावरे, पांडुरंग आहेर, भास्कर शिंदे, संकेत झावरे, दत्तात्रय जगदाळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“तहसीलदार हे जनतेचे सेवक असतात. मात्र पारनेर तहसीलदार माज दाखवत आहेत. वयोवृद्ध नागरिकांशी अरेरावी व अपमानास्पद वागणूक खपवून घेतली जाणार नाही. तात्काळ निलंबन झाले पाहिजे, अन्यथा मोठे आंदोलन छेडू.” सुजित झावरे पाटील, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद

टाकळी ढोकेश्वर येथील रस्ता रोको ही फक्त सुरुवात आहे. जनतेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील. अवैध वाळू धंदा बंद करा, दोषींना शिक्षा करा आणि तहसीलदारांची अरेरावी थांबवा. प्रशासनाने जनतेच्या भावना समजून घेऊन ठोस पावले उचलली नाहीत तर मोठे आंदोलन अटळ आहे.

मांडओहळ परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि भरधाव डंपरांची बेधडक वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नियमबाह्य उत्खननामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. हे अपघात नव्हेत, तर सरळ खून आहेत. याला जबाबदार गुन्हेगार आणि अधिकारी मोकाट फिरत आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment