सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर :- अहिल्यानगर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि चालक-मालक बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बैलगाडा शर्यत परवानगी प्रक्रियेतील गुंतागुंत अखेर संपुष्टात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, बैलगाडा शर्यतींसाठी परवानगी देण्याचे अधिकार तालुकास्तरावर प्रांताधिकारी (Sub-Divisional Officer) यांना प्रदान करण्यात आले आहेत.
या निर्णयामागे पारनेर तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा “पाटील इफेक्ट” ठळकपणे दिसून आला आहे.
पूर्वी बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी सर्व कायदेशीर अटी आणि नियम पूर्ण करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे विविध तालुक्यातील आयोजक आणि संघटनांना नगरपर्यंत वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. अनेकदा प्रक्रिया विलंबामुळे शर्यती रद्द व्हायच्या, आयोजकांवर आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण व्हायचा.
हीच समस्या लक्षात घेऊन सुजित झावरे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली होती की, बैलगाडा शर्यतींच्या परवानगीचे अधिकार प्रांताधिकारी यांना दिल्यास स्थानिक स्तरावर जलद निर्णय घेता येतील.
या मागणीवर जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित कार्यवाही सुरू केली आणि आज प्रत्यक्षात त्याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे आता पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, निघोज, जवळा, पिंपळगाव रोठा, विरोली, कान्हूर पठार, अळकुटी, पोखरी, काटाळवेढा, नांदूर पठार यांसारख्या भागांतील बैलगाडा शर्यत आयोजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैलगाडा चालक-मालक व रसिक बांधवांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की,
“अनेक नेते निवेदन देतात, पण एखाद्या विषयावर निवेदन देऊन त्याची अंमलबजावणी करवून दाखवणारे नेते म्हणजे सुजित झावरे पाटील होय.”
त्यांच्या प्रयत्नांमुळे बैलगाडा संस्कृतीचा मान राखणारा आणि ग्रामीण भागाला दिलासा देणारा हा निर्णय अखेर प्रत्यक्षात उतरल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.