विक्रम राठोड शिवसेना शिंदे गटात…!

On: Friday, January 9, 2026 7:41 PM
---Advertisement---

विक्रम राठोड शिवसेना शिंदे गटात; ठाकरे गटातील हिंदुत्वाची धार बोथट झाल्याचा केला आरोप…

 

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जबरदस्त झटका…

 

अहिल्यानगर :- आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठे खिंडार पडले असून, युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना(शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

पुण्यात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतः विक्रम राठोड यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा देत त्यांचे पक्षात स्वागत केले. हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

 

दिवंगत आमदार अनिल भैया राठोड यांनी सलग पाच टर्म अहिल्यानगर शहराचे प्रतिनिधित्व करत तब्बल पंचवीस वर्ष हिंदू धर्म रक्षणासाठी भरीव कार्य उभे केले. पराभवानंतरही शिवसेनेत उपनेते म्हणून त्यांचा दबदबा कायम होता. मात्र कोरोना काळात त्यांच्या अकाली निधनानंतर अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटात मोठी संघटनात्मक पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्याची जबाबदारी विक्रम राठोड यांच्यावर सोपवण्यात आली होती.

 

विक्रम राठोड यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महाविकास आघाडीत ठाम भूमिका, स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद वाढवणे यासाठी ते सातत्याने सक्रिय होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाने त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही, अधिक जबाबदारी देण्यात आली नाही, अशी तीव्र नाराजी त्यांच्या मनात निर्माण झाली.

 

यासोबतच ठाकरे गटाने हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका घेतल्याने व सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्वाची धार बोथट केल्याने ते अस्वस्थ होते. “वडिलांकडून मिळालेला हिंदुत्वाचा संस्कार गप्प बसू देत नव्हता,” असे मत त्यांनी जवळच्या सहकाऱ्यांशी व्यक्त केल्याचे समजते.

 

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपात आपल्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत विक्रम राठोड यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली होती. वेळोवेळी दिलेल्या सूचना डावलल्या गेल्याने अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णायक पाऊल उचलले.

 

विशेष म्हणजे मागील आठवड्यात अहिल्यानगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रम राठोड यांची उपस्थिती होती. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरमधील जाहीर सभेत त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याआधीच आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांना पुण्यात बोलावून घेत थेट तेथेच जाहीर पक्षप्रवेश घडवून आणला. अहिल्यानगर येथे होणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) विजयी जाहीर सभेत विक्रम राठोड यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

 

या पक्षप्रवेशावेळी भिंगार शहर प्रमुख प्रतीक भंडारी, उपशहर प्रमुख अमित लड्डा, शुभम मीरांडे, शिवसेना संघटक जिग्नेश जग्गड, उपजिल्हाप्रमुख नरेश भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

विक्रम राठोड यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे अहिल्यानगरमधील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता असून, येत्या महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment