वाळू तस्करांनी तरुणाला चिरडून ठार मारल्याच्या निषेधार्थ केले होते रस्ता रोको आंदोलन
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्यावरच प्रशासनाची कारवाई
पारनेर :- पारनेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि भरधाव डंपरांच्या दहशतीमुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतर उसळलेल्या जनआक्रोशाला वाट देणाऱ्या आंदोलनप्रकरणी आता प्रशासनाने थेट आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अवैध वाळू तस्करांवर कारवाई न करता जनतेसाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकप्रतिनिधींनाच लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
वासुंदे (ता. पारनेर) परिसरात रविवारी (४ जानेवारी २०२६) सकाळी साडेसातच्या सुमारास मांडओहळ नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने बोकनकवाडी ते वासुंदे रस्त्यावर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात संतोष नऱ्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात नसून अवैध वाळू तस्करीच्या दहशतीमुळे झालेला खून असल्याची भावना संपूर्ण तालुक्यात व्यक्त झाली होती.
उद्या टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकात रस्ता रोको करणार- सुजित झावरे पाटील
या घटनेच्या निषेधार्थ आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी ६ जानेवारी रोजी सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, युवक व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात मुख्य रस्त्यावर शांततामय पद्धतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा, दोषी डंपर चालक व मालकावर कठोर गुन्हे दाखल करावेत, तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालावा, या प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या होत्या.
पारनेर तहसीलदारांना तात्काळ निलंबित करा – टाकळी ढोकेश्वर रस्ता रोको आंदोलन
या आंदोलनाचा उद्देश प्रशासनावर दबाव टाकून अवैध वाळू तस्करी थांबवणे हाच होता. आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले असून ग्रामस्थांनी संयम राखत सहभाग नोंदवला होता. तालुक्यासह जिल्हाभरात या आंदोलनाची चर्चा झाली होती. मात्र वाळू तस्करांवर ठोस कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सुजित झावरे पाटील यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याने तालुक्यासह जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
विशेष म्हणजे, यापूर्वीही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पारनेर तहसील कार्यालयावर सुजित झावरे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्या वेळीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी उभ्या राहिलेल्या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल केल्याने, “लोकांचे प्रश्न मांडणे हा गुन्हा ठरतो का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अवैध वाळू तस्कर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा आरोप होत असून, यामुळे भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, अवैध वाळू उत्खनन थांबले नाही आणि निष्पाप नागरिकांचे बळी सुरूच राहिले, तर आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात उभे राहील, असा इशाराही दिला जात आहे.







