पारनेर अपडेट्स :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणानंतर पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, सुपा जिल्हा परिषद गटात माजी सभापती गणेश शेळके यांनी आपल्या पत्नी सौ. सुषमा शेळके यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षण जाहीर होताच शेळके समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाले असून आता फिक्स जिल्हा परिषद सदस्य म्हणून सौ.सुषमा गणेश शेळके यांचे बॅनर फिरू लागले आहेत.

सुपा गटामध्ये महिला मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच गणेश शेळके यांनी तातडीने समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वानुमते गणेश शेळके यांच्या पत्नी सुषमा शेळके यांची उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय झाला. आता शेळके कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून वाडेगव्हाण गणाचे नेतृत्व करताना गणेश शेळके यांनी विकासकामांची भक्कम पायाभरणी केली. पंचायत समिती सभापती म्हणून ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वाडेगव्हाण गण व सुपा गटात विविध विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क जाळे निर्माण झाले आहे.
सभापती गणेश शेळके यांचा लोकसंपर्क, राजकीय कसब आणि समाजातील सर्व स्तरात असलेली चांगली प्रतिमा पाहता सुषमा शेळके यांची उमेदवारी जाहीर होताच शेळके समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेळके यांची जिल्हा परिषदेकडे झालेली ‘राजकीय चढाई’ ही केवळ सत्तासमीकरणापुरती मर्यादित न राहता, सुपा गटात एक नवे नेतृत्व उदयास येण्याचा संकेत मानला जात आहे.