उद्या टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकात रस्ता रोको करणार- सुजित झावरे पाटील

On: Monday, January 5, 2026 10:07 PM
---Advertisement---

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक; ३२ वर्षीय तरुणाचा बळी

बोकनकवाडी-वासुंदे रोडवर घडली घटना

टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशन समोर मृतदेह सह नातेवाईकांचा ठिय्या

पारनेर/प्रतिनिधी :
मांडओहळ येथील नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बोकनकवाडी ते वासुंदे रोडवर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ४ जानेवारी) सकाळी सुमारे ७ वाजता घडली. मृत तरुणाचे नाव संतोष अहिला नऱ्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) असे आहे.
संतोष हे बदलापूर पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे पती असून, त्यांची बहीणही पोलिस दलात सेवा बजावते. अपघातानंतर नातेवाइकांनी संतोष यांना तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष हे आपल्या दुचाकीवर (क्र. एमएच १६ सीएल ६४०४) वासुंदे गावाकडे जात होते. त्यावेळी मांडओहळ नदीपात्रातून अवैध वाळू भरून आणणाऱ्या डंपरने (क्र. एमएच २२ एएन ७१७१) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेने संतोष दुचाकीवरून खाली पडले आणि डंपरच्या मागील चाकाखाली येऊन फरफटत गेले. यात ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर डंपरचालकाने वाळू रस्त्यावरच खाली करून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी व पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे. भाऊसाहेब रंगनाथ टोपले (वय ५०, रा. बोकनकवाडी) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात डंपरचालक विकास किसन शिंदे (रा. वडगाव सावताळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू वाहतुकीमुळे असे अपघात वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

4

 

अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाईची गरज

मांडओहळ परिसरात सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहे. नियमबाह्य वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. महसूल,पोलीस प्रशासनाने समन्वयाने कारवाई करत दोषींवर कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे.

 

पोलीस स्टेशन समोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

वासुंदे येथील माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता, त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर दुपारी ४ वाजता संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह टाकळी पोलिस ठाण्यासमोर आणून ठेवला.
आरोपी चालक-मालकाला हजर केले जात नाही, तसेच तहसीलदार याठिकाणी येत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
सपोनि नितीन खंडागळे व सपोनि दीपक सरोदे यांनी वरिष्ठांशी व नातेवाईकांशी चर्चा करीत तोडगा काढला. त्यानंतर सायंकाळी उशिरा बोकनकवाडी येथे तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment