राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू; 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीवर प्रक्रिया
मुंबई | प्रतिनिधी :- राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांची प्राथमिक तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतच्या नावे असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचा उपयोग करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी तसेच आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक तयारीसाठी महत्त्वाचे मुद्दे :
- स्वतंत्र मतदार यादी तयार न करता भारत निवडणूक आयोगाच्या यादीचा उपयोग केला जाणार.
- बहुसदस्यीय मतदारसंघ प्रणालीमुळे मतदान केंद्रांची संख्या विधानसभेपेक्षा अधिक राहणार.
- मतदान केंद्रांची संख्या, जागा, इमारतींची स्थिती, तसेच तेथील सर्व सोयीसुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश.
- दिव्यांग आणि सर्वसामान्य मतदारांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर.
मतदान यंत्रांच्या तयारीसाठी विशेष निर्देश :
- प्रथमस्तरीय तपासणी तातडीने पूर्ण करणे आवश्यक.
- मतदान यंत्रांची अचूक उपलब्धता तपासून, आवश्यक यंत्रे वेळेवर सज्ज ठेवावी.
- यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना वेळेत राबवाव्यात.
मनुष्यबळ आणि समन्वय यंत्रणा :
- मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश.
- मनुष्यबळाच्या कमतरतेचा वेळोवेळी आढावा घेण्याचे आणि विभागीय आयुक्तांशी समन्वय ठेवण्याचे आदेश.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे स्वरूप :
- या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेतल्या जातात, त्यामुळे निवडणूक यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन आवश्यक असते.
- राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्र निश्चितीचे स्वतंत्र निकषही निश्चित केले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता व कार्यक्षम नियोजन महत्त्वाचे आहे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी वेळेत तयारी पूर्ण करावी.
राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी शासन आणि निवडणूक आयोगाकडून सर्वंकष तयारीचा धडाका सुरू असून, प्रत्येक जिल्ह्याला वेळापत्रकानुसार नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.