शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन :- बाळासाहेब खिलारी यांचा इशारा
पारनेर तालुक्यात युरियाच्या टंचाईचे नाट्य, लिकिंगच्या माध्यमातून उघडपणे शेतकऱ्यांची अडवणूक
पारनेर :- खरीप हंगाम सुरू असतानाच पारनेर तालुक्यात युरिया खताच्या नावाखाली शेतकऱ्यांची उघड लूट सुरू आहे. युरिया खत मिळवण्यासाठी काही कृषी दुकानदार शेतकऱ्यांना अन्य औषधांच्या खरेदीस भाग पाडत आहेत. या प्रकारामुळे संतप्त झालेले निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
खते विकत घ्या, पण औषधे घेणे ‘अनिवार्य’!
शासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी खतांची व्यवस्था केली असतानाही युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. युरिया हवे असल्यास त्यासोबत इतर कीटकनाशके किंवा खते घेणे बंधनकारक असल्याचे काही दुकानदार शेतकऱ्यांना सांगत आहेत. ही एकप्रकारे ब्लॅकमेलिंग असून, शासनाच्या धोरणाचा प्रत्यक्ष उल्लंघन आहे. शेतकऱ्यांना औषध खरेदीस भाग पाडणे, म्हणजे त्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासारखीच गोष्ट असल्याचे मत बाळासाहेब खिलारी यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर निलेश लंके प्रतिष्ठानचा अन्यायाविरुद्ध आवाज..!
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर निलेश लंके प्रतिष्ठानने याप्रकरणी पुढाकार घेत तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या निवेदनात खताच्या विक्रीदरम्यान शेतकऱ्यांकडून सक्तीने औषधांची खरेदी करून घेतली जात असल्याचे नमूद केले आहे. या प्रकारामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
शेतकऱ्याची व्यथा – ‘नको ते खत घ्यायला भाग पाडले’
टाकळी ढोकेश्वर येथील शेतकरी बबनराव झावरे यांनी याबाबत स्पष्ट उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, “२८० रुपयांचे ४५ किलोचे युरिया खते घेण्यासाठी मला सुमारे १००० रुपयांचे लिकिंग खत जबरदस्तीने खरेदी करावे लागले. मी नकार दिला असता दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरून मला अपमानित केले.”
कृषी विभागाची गांधारी भूमिका?
तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर युरिया उपलब्ध असूनही तो लिकिंगसहच विकला जात आहे. हे प्रकरण कृषी विभागाच्या निदर्शनास असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. बाळासाहेब खिलारी यांनी विभागाच्या ‘सोयीस्कर दुर्लक्ष’ वरही ताशेरे ओढले.
अंतिम इशारा – सक्ती थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू!
या सर्व परिस्थितीवर त्वरित उपाययोजना न झाल्यास आणि संबंधित दुकानदारांवर कारवाई न झाल्यास प्रतिष्ठानच्या वतीने तालुका स्तरावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा बाळासाहेब खिलारी यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, उद्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या संकटात भर टाकणाऱ्या या लिकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या लूटीस त्वरित लगाम घालण्याची गरज आहे. अन्यथा ही चळवळ केवळ कृषी सेवा केंद्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्याला व्यापणारी ठरू शकते.