“निलेश लंकेचा शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी आहे, एकदा दिलेला शब्द मी मोडत नसतो” असे म्हणतं मारुती रेपाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब…
“जाईल तर जिल्हा परिषदेतच जाईल”; असा निश्चय करून कान्हूर पठार गटात कामाला लागण्याचे खासदार निलेश लंके यांचा आदेश…

पारनेर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कान्हूर पठार गटात राजकीय घडामोडींना वेग आला असून, खासदार निलेश लंके यांनी पुणेवाडी गावचे सरपंच, बाजार समितीचे माजी संचालक मारुती रेपाळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. “ही फायनल उमेदवारी आहे. निलेश लंकेचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी आहे. आता तुम्ही तयारीला लागा. जाईल तर जिल्हा परिषदेतच जाईल असा निश्चय करा,” अशा शब्दांत खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

कान्हूर पठार येथे विविध विकास कामांच्या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत खासदार लंके यांनी मारुती रेपाळे यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. “तुमचा खटका जुळत असतो. लोकांशी सतत जोडलेला, लोकांसाठी झटणारा नेता म्हणून मारुती रेपाळे यांची ओळख आहे,” असे सांगत त्यांनी मारुती रेपाळे यांच्या जनसंपर्काची ताकद अधोरेखित केली.
पुणेवाडीचे सरपंच म्हणून काम करताना गावाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, बाजार समितीचे माजी संचालक म्हणून शेतकऱ्यांसाठी केलेले प्रयत्न आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी घेतलेली धावपळ यामुळे मारुती रेपाळे यांनी लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीची संधी देण्यात आल्याचे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.

“एवढा दानशूर माणूस, लोकांसाठी अहोरात्र काम करणारा माणूस जिल्हा परिषदेत जाणे गरजेचे आहे. अशा माणसांची समाजाला गरज आहे,” असे गौरवोद्गारही खासदार निलेश लंके यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात उस्फुर्त दाद दिली व मारुती रेपाळे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले.
मारुती रेपाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून कान्हूर पठार गटात सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कामांमुळे चर्चेत आहेत. गावोगावी संपर्क, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार आणि विकासकामांबाबतची आक्रमक भूमिका यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान खासदार निलेश लंके यांच्या या घोषणेमुळे कान्हूर पठार गटातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, निवडणुकीपूर्वीच वातावरण तापू लागले आहे. कार्यकर्त्यांनीही “मारुती रेपाळे यांनाच विजयी करायचे” असा निर्धार व्यक्त करत आता निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.







