राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध आघाड्यासह तालुका कार्यकारिणी बरखास्त, निवडणुकांपूर्वी संघटनेची पुनर्बांधणी सुरू
पारनेर :- पारनेर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ने तालुका कार्यकारिणीसह सर्व विभाग (सेल) बरखास्त केले आहेत. तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेब तरटे म्हणाले की, हा निर्णय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर आणि खासदार निलेश लंके यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. संघटनेत नवचैतन्य निर्माण करणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि तळागाळापर्यंत पक्ष अधिक बळकट करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
या निर्णयानुसार तालुका व शहर कार्यकारिणीसह युवक, महिला, किसान सेल, डॉक्टर सेल, विधी सेल, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, अपंग सेल आणि सांस्कृतिक सेल या सर्व विभागांच्या अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात व्यापक फेरबदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकार परिषदेला शिक्षक नेते रा.या. औटी, माजी सभापती किसनराव रासकर तसेच काँग्रेसचे नेते शिवाजीराव जाधव उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बाबासाहेब तरटे यांनी पुढे सांगितले की, लवकरच खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकींमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा होणार असून, नव्या तालुका कार्यकारिणीसह विविध विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या बैठकींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, पक्षात नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक रणनीतीसह मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.
🛑बाबासाहेब तरटे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची यशस्वी वाटचाल
“२०१८ साली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाने सलग १५ वर्षांनंतर आमदारकी मिळवली. तसेच खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँक संचालक पदासह विविध निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळाले. ही कामगिरी समाधानकारक आहे,” असे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी नमूद केले. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळण्याची तयारी असल्याचे सुतोवाच बाबासाहेब तरटे यांनी केले असून सातत्याने पक्षाशी प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ आतापर्यंत मिळाले असून पुढील काळात आणखीन जबाबदारी पेलण्यासाठी आपण सज्ज असल्याचे तरटे म्हणाले.







