पारनेर :- “आपल्या जिल्ह्याचे आदर्श पालकमंत्री पारनेर तालुका दौऱ्यावर आहेत. तुम्ही काम मंजूर करा व कामाचे उद्घाटन करा. निलेश लंकेने मंजूर केलेल्या कामांचे कशाला उद्घाटन करता?” अशा शब्दांत खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उदघाटन व भूमिपूजन होत असलेल्या पारनेर तालुक्यातील विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला.
खासदार निलेश लंके पुढे म्हणाले की, “मी सात कोटी रुपयांची पळशी येथे आश्रम शाळा बांधली. त्याचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पारनेरचे बस स्टॅन्ड मी मंजूर करून आणले आहे. तसेच कोर्टाची इमारतही मी मंजूर करून आणली आहे. तरीही त्याची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे करत आहेत.” यावर खासदार लंके यांनी अधिक आक्रमक होत म्हटले की, “मी दुसऱ्याच्या कामांची पाहणीसुद्धा करत नाही आणि दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामावर जातसुद्धा नाही. मी आमदार झाल्यापासून कोणाच्याही कामाचे खोटं उद्घाटन केलेलं नाही. तसेच खोटं मी करत नसून आपल्या झेंड्यावर छाती काढून मी पंढरपूरला जात असतो. दुसऱ्याच्या कामाचे खोटे नाटे चोरट्या भामट्यावाणी भूमिपूजन मी करत नसतो,” असे म्हणत खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार टोला लगावला.
“तुम्ही तुमची कामे मंजूर करा व नंतर उद्घाटन करा. तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीत काय केलं ते बघा. फक्त जिरवा-जिरवी केली पण काम केली नाही,” अशा शब्दांतही खासदार लंके यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना सुनावले.
राजकीय वातावरण अधिक तापवत खासदार लंके पुढे म्हणाले, “स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायला शिका. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करू नका,” असा खोचक टोला त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.
याचवेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “जिल्हा नियोजनच्या मीटिंगमध्ये कामांची चर्चा केलेली नाही. शेवटी ज्याला जे करायचे ते करू द्या, ज्याचं त्याला लख लाभ लागू. आपला तालुका स्वाभिमानी असून, आपला तालुका असाच स्वाभिमानी ठेवावा,” असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केले.
पारनेर तालुक्यातील विकासकामांच्या श्रेयावरून आता खासदार लंके व पालकमंत्री विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, खासदार निलेश लंके यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर दौऱ्यावर आल्यावर खासदार निलेश लंके यांच्या टिकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच हा राजकीय संघर्ष अधिक चिघळणार का आणि त्याचा पारनेर तालुक्यातील विकासकामावर काही परिणाम तर नाही ना होणार याकडे भविष्यात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.







