पारनेर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ६ ते १० या वेळेत सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाजावर मोठा परिणाम होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट अहिल्यानगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांची भेट घेतली.

यावेळी सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील नागरिकांच्या तीव्र भावना अधिकाऱ्यांसमोर मांडत वारंवार होणाऱ्या वीज खंडितप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. तसेच, सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांच्या कामात अडथळे आणि महिलांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावर कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आज किंवा उद्यापासून वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करून समस्या कमी करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, नागरिकांनीही लवकरात लवकर सुरळीत वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







