कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा एल्गार; नगर-कल्याण महामार्ग रोखला
पारनेर :- कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १५ मे) नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे नेते तथा नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कांद्याला सध्या बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. “शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. कांद्याला तात्काळ हमीभाव मिळाला पाहिजे, तसेच निर्यातबंदी पूर्णपणे हटवली पाहिजे. सरकारने वेळीच ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल,” असा इशारा राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी आंदोलनस्थळी दिला.
आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य हमीभाव देणे, निर्यातबंदी उठवणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांची थकीत वीजबिले माफ करणे आणि पीकविम्याचा लाभ तातडीने मिळवून देणे या प्रमुख मागण्या केल्या. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. टाकळी ढोकेश्वर चौक परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांशी प्रशासनाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी कायम ठेवला. अखेर प्रशासनाने मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला. आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, महिला आघाडीच्या नेत्या सोनिया राजदेव, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, शहराध्यक्ष संदीप मत, लखन ठाणगे, जालिंदर लंके, विक्रम काळे, विश्वास शेटे, सरपंच शिवाजी निमसे, पोपट गुंड, संदीप ठाणगे, सरपंच अभिजित झावरे, प्रकाश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, भानुदास आग्रे, बाळासाहेब चिकणे, संतोष चिकणे, साहेबराव चिकणे, शिवराम चिकणे, रामभाऊ थोरात, सरपंच बापू ठुबे, आयुब हवलदार, गंगाराम चिकणे, रामदास साळवे, बापू नरड, पोपट नरड, राजेंद्र शेरकर, विकास दगाबाज, जयवंत वाळुंज यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, या आंदोलनामुळे जिल्ह्यातील कांदा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट : आंदोलनात दिसले माणुसकीचे दर्शन
नगर-कल्याण महामार्गावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कल्याणकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी तात्काळ मार्ग करून दिला. त्यामुळे आंदोलनस्थळी माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
चौकट : राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ !
रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. मात्र अपेक्षित संख्येने स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकारी व काही कार्यकर्ते आंदोलनात सहभागी न झाल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली. टाकळी ढोकेश्वर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात होते. पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्याच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.







