खासदार निलेश लंके यांचा माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना पुन्हा धोबीपछाड

On: Wednesday, April 8, 2026 6:56 PM
---Advertisement---

खासदार निलेश लंके यांचा न्यायालयीन लढाईतही विजय

माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक याचिका फेटाळली

अहिल्यानगर :-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयासोबतच न्यायालयीन लढाईतही लंके यांनी आपली बाजू भक्कम सिद्ध केली आहे.

१३ मे २०२४ रोजी पार पडलेल्या मतदानानंतर ४ जून २०२४ रोजी जाहीर झालेल्या निकालात खासदार नीलेश लंके यांनी ६,२४,७९७ मते मिळवत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा २८,९२९ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर १८ जुलै २०२४ रोजी डॉ. सुजय विखे यांनी Representation of People Act, 1951 अंतर्गत निवडणूक याचिका दाखल करून या निकालाला आव्हान दिले होते.

या प्रकरणात समन्स मिळाल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी Exh.13 (I.A. No.34/2024) अर्ज सादर केला. सदर अर्ज Representation of People Act मधील कलम ८३ व ८६(१) तसेच CPC, 1908 मधील Order 7 Rule 11 (a)(b) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. या अर्जाद्वारे संबंधित निवडणूक याचिका कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्यामुळे ती फेटाळून लावावी, अशी मागणी करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी या प्रकरणातील सर्व बाजूंचे युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतले. खासदार लंके यांच्या वतीने अ‍ॅड. प्रमोद पाटील यांनी प्रभावी मांडणी केली. त्यांना अ‍ॅड. राहुल जोंधळे, अ‍ॅड. राहुल तेमक, अ‍ॅड. श्याम सोलंके आणि अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सहकार्य केले.

अखेर दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने निकाल देत खासदार नीलेश लंके यांचा अर्ज मंजूर केला आणि डॉ. सुजय विखे यांची Election Petition No.1/2024 ही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्यामुळे फेटाळून लावली.

या निकालानंतर खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हा विजय माझा नाही हा सत्याचा, न्यायाचा आणि जनतेच्या अटळ विश्वासाचा विजय आहे. लोकसभेच्या निकालानंतर काहींनी जनतेच्या कौलाचा अपमान करत न्यायालयात धाव घेतली. खोटे आरोप, दबाव आणि निकाल बदलण्याचे प्रयत्न झाले; मात्र सत्य कधीच हरत नाही, हे आज पुन्हा सिद्ध झाले.”

ते पुढे म्हणाले, “न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला आहे की जनतेचा निर्णय हा सर्वोच्च असतो. मी न्यायव्यवस्थेचा मनापासून आभारी आहे. हा आनंद वैयक्तिक नसून नगर दक्षिणच्या जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. आम्ही कोणत्याही दबावाला झुकणार नाही. आमचा स्वाभिमान कायम ठेवत जनतेची सेवा करत राहू. अखेर सत्यमेव जयते.”

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment