पारनेर :- पिंपळगाव रोठा व कारेगाव परिसरात पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. पिंपळगाव रोठा मुख्य चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक लंके, युवा नेते रवींद्र राजदेव, सामाजिक कार्यकर्ते भगवान भांबरे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक घुले, बाळासाहेब भांबरे व पंचशील तरुण मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील बर्वे होते.
कार्यक्रमाच्या अगोदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमांची पारंपारिक वाद्यांच्या गजरात, ढोल-लेझीमच्या ठेक्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत तरुणाईसह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. घोषणाबाजी व वाद्यांच्या निनादात संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी समाज प्रबोधनकार अजय महाराज बारस्कर यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले. बाबासाहेबांनी समाजाला दिलेल्या शिक्षण, समता, बंधुता व न्यायाच्या मूल्यांचा अंगीकार करून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बारस्कर महाराज म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष हा केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित नसून पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाने त्यांच्या संघर्षातून शिकून स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समाजातील भोंदूगिरी व अंधश्रद्धांवर जोरदार टीका करत फसवणूक करणाऱ्यांविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रवृत्तींचा बुरखा फाडून त्यांना योग्य ती जागा दाखवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना त्यांनी समाजात वाढत चाललेल्या जातीयतेच्या प्रवृत्तीवरही भाष्य केले. जाती-जातींमध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जातीयवादाचे समूळ उच्चाटन करून सर्वांनी एकोप्याने, सलोख्याने व बंधुभावाने राहावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या विचारांनुसार समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफिक शेख यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच अशोक पंडित यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी अविनाश देशमुख, संपत पवार, संतोष विधाते, अतुल भालेराव, सूर्यकांत गायकवाड, देवदत्त साळवे, संजय मोरे, माजी सरपंच साहेबराव खरात, विद्यमान सरपंच बापूराव ठुबे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता घुले, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, सचिन पंडित, प्रवीण पंडित, सुमित पंडित, नितीन शिरसाट, गौतम शिरसाट, दत्ता उमाप, मंगेश पंडित, सार्थक पंडित, स्वप्निल उमाप, संदीप उमाप, सचिन उमाप, रवींद्र साळवे, सोमनाथ उमाप, शिवाजी उमाप, अनुकल्प पंडित, साहेबराव पंडित, लहू पंडित, विश्वास पंडित, तन्मय पंडित, रफिक शेख, शरद जगदाळे, गंगाराम कोळेकर, दिलीप जगताप, सुदर्शन सकट, पांडुरंग घुले, दत्ता राजदेव, वैभव घुले, मानव नेपाळे, नेतीक नेपाळे, एकलव्य उमाप, सौरभ क्षीरसागर यांच्यासह पिंपळगाव रोठा, कारेगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सामाजिक एकोपा, जागरूकता व प्रेरणा देणारा ठरला.







