अहिल्यानगर :- अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या महासंग्रामाला आज राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा युतीच्या वतीने प्रचार फेरीने व सभेने प्रारंभ झाला. शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरात महाआरती करून व नारळ अर्पण करत युतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. या धार्मिक विधींनंतर माळीवाडा ते दिल्लीगेट दरम्यान भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत उसळलेला जनसागर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, अहिल्यानगरमध्ये युतीचा किल्ला पुन्हा एकदा अभेद्य होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.



प्रचार फेरीदरम्यान शहरातील विविध भागांतून नागरिकांनी सहभाग नोंदवला. फलक, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण परिसर निवडणूकमय वातावरणाने भारावून गेला होता. युतीच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास या फेरीतून प्रकर्षाने जाणवत होता.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेत युतीचा महापौर निवडून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्वांवर सोपवली. तसेच संघटनात्मक ताकद, एकजूट आणि जनसंपर्काच्या जोरावर युती निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अहिल्यानगर शहर सुरक्षित, स्वच्छ, सुंदर आणि भयमुक्त बनवण्यासाठी युती पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, स्वच्छता, नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि शाश्वत विकास यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यावेळी म्हणाले की, अहिल्यानगरच्या विकासाची भक्कम पायाभरणी युतीनेच केली असून, त्या मजबूत पायावर प्रगतीची उंच भरारी घेणारे आधुनिक नगर उभे करण्याचा निर्धार त्यांनी केला. ही युती केवळ सत्तेसाठी नसून, शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास त्यांनी दिला. केंद्र व राज्य सरकारच्या भक्कम पाठबळावरून नगरचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे युतीचे बिनविरोध निवडून आलेले पाच नगरसेवक यांचा सन्मान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हा बिनविरोध विजय म्हणजे जनतेने युतीच्या कार्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाची पहिली आणि ठोस पावती असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
युतीचे सर्व उमेदवार सक्षम, अनुभवी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. विकासाची ही ज्योत शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करत, आगामी निवडणुकीत युतीला मोठे जनसमर्थन मिळेल, असा आशावाद या प्रचाराच्या प्रारंभातून व्यक्त झाला.







