महावितरणचा भोंगळ कारभार : भाळवणी–भांडगाव रोडवर रस्त्यालगत उभारली डीपी

On: Tuesday, December 16, 2025 8:35 PM
---Advertisement---

 

 

भाळवणी : पत्रकार शुभम मेहेर

महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार भाळवणी–भांडगाव रोडवरील डोंगर परिसरात समोर आला आहे. येथे चक्क रस्त्याच्या साईड पट्टीवर, रस्त्यापासून अवघ्या पाच ते सहा फूट अंतरावर वीज वितरणाची डीपी उभारण्यात आली आहे. ही डीपी इतक्या जवळ आहे की रस्त्यावर उभा राहून सहज हात लागेल, अशी स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये रोष तयार झाला आहे

 

भाळवणी–भांडगाव हा परिसरातील महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता आहे. याच मार्गावरून भांडगाव, जामगाव, दैठणे, सारोळा आडवाई आदी गावांतील शाळकरी विद्यार्थी रोज भाळवणी येथे शाळेसाठी ये-जा करतात.अनेक विद्यार्थी पायी चालत जात असतात,मुलांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे डीपी उभारणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष असल्याची भावना व्यक्त होत आहे. भाळवणी ही मोठी बाजार पेठ असून नागरिकांची जास्त प्रमाणामध्ये ये जा करत असतात व मोठ्या डबल वाहनांना जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या डीपीभोवती कोणतेही संरक्षण कुंपण नाही, धोक्याचे फलक लावलेले नाहीत आणि सुरक्षित अंतराचाही विचार करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. अशा वेळी एखादे वाहन घसरल्यास किंवा मुलांचा निष्काळजीपणे स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“एखादा अपघात झाल्यावरच महावितरण जागे होणार का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. यापूर्वीही अनेक ठिकाणी महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडलेले असताना, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप होत आहे.

या डीपीची तात्काळ पाहणी करून ती योग्य व सुरक्षित ठिकाणी हलवावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जर याकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर स्थानिक नागरिक व पालक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

भविष्यात या डीपीमुळे कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाचीच राहील, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment