अहिल्यानगर :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यातील तातडीच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकरी, मजूर, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक अशा पाच महत्वाच्या विषयांवर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ठोस मागण्या केल्या.
♦️अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट पंचनाम्यांची मागणी
गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पारनेर-नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणतेही निकष न लावता नुकसानग्रस्त भागात सरसकट शेती पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी सुजित झावरे पाटील यांनी केली.
♦️बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी अधिकार प्रांताधिकाऱ्यांना
बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात होणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून सुजित झावरे पाटील यांनी परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी स्थानिक प्रांताधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रांताधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यामुळे आता बैलगाडा चालक-मालक संघटनेचा किचकट कागदांचा प्रवास सुकर होणार आहे.
♦️रोजगार हमीतील स्थगित कामे सुरू करण्याचा निर्णय
पारनेर-नगर तालुक्यात मंजूर सिमेंट रस्त्यांची कामे शासनाने स्थगित केली होती. ही कामे दिवाळीनंतर सुरू करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सुजित झावरे पाटील यांनी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या कामांचा तातडीने प्रारंभ व्हावा, असा आग्रह धरला.
♦️आधार केंद्र सुरू करण्यास हिरवा कंदील
टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी परिसरातील विद्यार्थ्यांना आधार लिंकसाठी होत असलेल्या मोठ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर येथे आधार केंद्र सुरू करण्याची मागणी सुजित झावरे पाटील यांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
♦️वासुंदेला राष्ट्रीयकृत बँकेची मागणी
वासुंदे येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने संपूर्ण परिसर अडचणीत आहे. यावर उपाय म्हणून वासुंदेला राष्ट्रीयकृत बँक मंजूर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बँक समितीच्या बैठकीत मांडण्यात यावी, अशी सुजित झावरे पाटील यांनी मागणी केली आहे त्यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने पारनेर तालुक्यातील शेतकरी, मजूर व नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती सुजित झावरे पाटील यांनी दिली आहे.