web analytics
---Advertisement---

अरे देवा..! चक्क पारनेर आगाराची बसचं हरवली..!

On: Thursday, September 18, 2025 9:09 PM
---Advertisement---

बससेवेचा उदघाटनाचा दिखावा; दुसऱ्याच दिवशी बस गायब!

पारनेर :- पारनेर आगारातून नव्याने सुरू करण्यात आलेली पारनेर–निघोज–पाबळ–अळकुटी ही बससेवा केवळ एक दिवस धावून रहस्यमयरीत्या गायब झाली आहे. या घटनेमुळे पाबळ ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, स्थानिक लोकप्रतिनिधींवर केवळ उदघाटनाचा दिखावा करून गावकऱ्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप होत आहे.

पाबळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सोनाली संदेश कापसे यांनी पारनेर बस डेपोत तक्रार दाखल करून हरवलेल्या बसचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गावातून बससेवा सुरू होणार असल्याने शालेय विद्यार्थी, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण होते. बसच्या पहिल्याच दिवशी गावात फेटे बांधून चालक-कंडक्टर यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, त्या दिवशी गेल्यानंतर बस पुन्हा कधीही गावात आलीच नाही. परिणामी गावकरी दररोज बसची वाट पाहून हताश होत आहेत.”

यासोबतच त्यांनी टोला लगावत म्हटले की, “फक्त एका दिवसासाठी बस आणून तिचा प्रचार करणे आणि लोकांना दिशाभूल करणे हे योग्य नाही. अशा प्रकारे सत्तेचा वापर करून गावकऱ्यांच्या भावनांशी खेळणे हा प्रकार निषेधार्ह आहे.”

गावकऱ्यांचा आरोप आहे की, बससेवा ही केवळ उदघाटनापुरती मर्यादित ठेवून प्रत्यक्षात बस गावात येणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी व महिला वर्गाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

आता प्रश्न असा आहे की, पाबळकरांच्या आशेची बस नेमकी हरवली कुठे? ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पारनेर आगार प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपसरपंच सोनाली संदेश कापसे नक्की काय म्हटल्या आहेत :-

प्रति,
मा.आगार प्रमुख
पारनेर बस डेपो.

विषय :- पारनेर बस डेपो ने नव्याने सुरु केलेली *पारनेर निघोज पाबळ अळकुटी* ही बस उदघाट्न झाल्यापासून हरवलेली आहे ती आजतगायत सापडली नसल्याने तिचा शोध घेणे बाबत..

महोदय,
मी सोनाली संदेश कापसे पाबळ गावची उपसरपंच आपणास नम्रपने कळवू इच्छिते कि,आमच्या गावातील स्थानिक पुढऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या अधिकार क्षेत्राच्या डेपोतील बससेवा आमच्या गावातून सुरु केल्याचे जाहीर केले,आम्हीही मोठया आनंदाने आपल्या गावातून निघोज अळकुटी साठी बस सुरु झाल्याने शालेय विद्यार्थी,महिला वर्ग व ज्येष्ठ मंडळी समवेत समाधान व्यक्त केले.ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच बस गावात आली,स्थानिक पुढऱ्यांनी बस ड्रायव्हर व कंडक्टर यांचा मोठ्या दिमाखात फेटा बांधून सत्कार देखील केला.
(पुरावा म्हणुन सोबत फोटो देत आहे).
परंतु त्यादिवशी गावातून गेलेली बस आजपर्यंत पर्यंत गावात आलेली नाही,आम्ही सदर बसचा खूप शोध घेतला,रोज सकाळी बस गावात येईल म्हणुन वाट पहात असतो आम्ही सर्वजण परंतु बस काही गावात यायचं नाव घेत नाही,सदर बस हरवली असल्याची माझी तक्रार आहे. कृपया आपण बस चा शोध घ्यावा ही विनंती..

(सत्तेचा चुकीचा वापर करून एका दिवसासाठी गावात बस आणून लोकांच्या भावनांशी खेळणे हे कितपत योग्य आहे हे तालुक्याला अन गाव पुढऱ्यांनाच माहित.)

आपलीच शुभचिंतक
सौ.सोनाली संदेश कापसे
उपसरपंच पाबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment