अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; खा. निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहिल्यानगर :- गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक तालुक्यांत अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
खा. लंके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यांत सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, बाजरी आणि भाजीपाला यांसह सर्व हंगामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे.
तसेच, सततच्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होत असून, धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये तलावासारखी परिस्थिती झाली आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक वाड्या-वस्त्यांवरील रस्ते वाहून गेले आहेत. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
“या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पिके नष्ट होऊन उपजीविकेवर मोठा परिणाम झाला असून, तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे,” असे खा. लंके यांनी स्पष्ट केले.
निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की,
- सर्व तालुक्यांतील शेतपिकांचे तसेच सार्वजनिक सुविधांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत.
- शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.
- पूरसदृश व धोकादायक ठिकाणी मदत यंत्रणा तातडीने पोहोचवावी.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटात शासनाने तातडीने मदतीसाठी पुढे यावे, अशी ठाम भूमिका खासदार लंके यांनी मांडली आहे.