अहिल्यानगर :- शिर्डी विभागातील उपअधीक्षक अमोल भारती यांच्या कारभाराविरोधात गंभीर आरोप होत असून खासदार नीलेश लंके यांनी पोलिस महासंचालकांकडे निवेदन देत “जनतेवरील पोलिसी दहशत थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी” अशी ठाम मागणी केली आहे.
खासदार लंके यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोल्हार गावातील उद्योजक कैलास पिलगर यांना लोणी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. त्यांच्या गल्ल्यातील रोकड हिसकावून घेतली, तसेच “तक्रार केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशा धमक्या देण्यात आल्या.
याच प्रकरणावर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा विधवा शितल गोरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे प्रश्न उपस्थित केला. मात्र या धाडसाचा बदला घेण्यासाठी उपअधीक्षक अमोल भारती यांनी त्यांना मारहाण केली, अश्लाघ्य भाषा वापरली, तसेच जीवघेण्या धमक्या दिल्या, असा गंभीर आरोप लंके यांनी केला आहे. “तुला व तुझ्या मुलाला गाडीखाली चिरडून टाकीन, अमोल भारती जे बोलतो ते करतो” अशा स्वरूपाच्या वारंवार धमक्या दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर गोरे यांचा मोबाईल हिसकावून त्यातील पुरावेही नष्ट केल्याचेही आरोप पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
खा. लंके यांनी स्पष्ट केले की, “लोकशाही व्यवस्थेत पोलीस ही जनतेची सुरक्षा देणारी यंत्रणा असते. मात्र शिर्डी विभागात पोलीसच जनतेवर दहशत माजवत आहेत. हा लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे.”
त्यांनी पोलिस महासंचालकांकडे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :
या प्रकरणांतील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करावेत.
उपअधीक्षक अमोल भारती यांचे निलंबन करून स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत.
संबंधित प्रकरणांमध्ये सामील पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
पोलिस दहशतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे.
या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “संपूर्ण प्रकरणावर कठोर, ठोस आणि पारदर्शक कारवाई होणे अत्यावश्यक आहे” असे खा. लंके यांनी आपल्या निवेदनात ठणकावले आहे.