अहिल्यानगर- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच लोकांच्या अडचणी सोडवाव्यात, असे आवाहन आमदार व जिल्हा संयोजक मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले.
अहिल्यानगर येथील बंधन लॉन्स येथे झालेल्या या बैठकीत प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, आमदार मोनिकाताई राजळे, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांसह भाजपचे सर्व पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष, आघाडी संयोजक, माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवा शिबिरांतून नागरिकांशी थेट संपर्क
आ. चव्हाण म्हणाले की, शॉप अॅक्ट प्रमाणपत्र, महसूलाशी निगडीत अडचणी, रोजगार हमी, पानंद रस्ते, तुकडेबंदी, अतिक्रमण आदी विषयांसाठी जिल्ह्यात कॅम्प पद्धतीने सेवा शिबिरे आयोजित केली जातील. एका ठिकाणी किमान ५० नागरिकांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर असेल.
या शिबिरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शॉप अॅक्ट निरीक्षक, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
“महा समाधान शिबिरे प्रत्येक तालुक्यात घेऊन किमान ५० हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गावागावांतील प्रलंबित दाखले, शासकीय कागदपत्रे, स्मशानभूमीवरील अतिक्रमण, पानंद रस्त्यांचे प्रश्न यावर या सेवा पंधरवड्यात काम होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर भाजपची भूमिका ठामपणे मांडा
चव्हाण पुढे म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिका ठामपणे मांडली पाहिजे. काही विरोधक अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना उत्तर देताना कार्यकर्त्यांनी जिगर दाखवून पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी. कार्यकर्ते पक्षासाठी झोकून देतील तर पक्षही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो.”
“हा जिल्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या दहा वर्षांत महायुतीच्या मेहनतीतून १० आमदार निवडून आले असून आता हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“अहिल्यानगर राज्यात क्रमांक १ वर नेऊ” – डॉ. सुजय विखे पाटील
या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि रवीजींच्या स्पष्ट भूमिकेमुळे हा सेवा पंधरवडा राज्यात आदर्श ठरेल. माझा विश्वास आहे की या उपक्रमामुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात क्रमांक १ वर पोहोचेल.”
आरोग्य सेवेसंदर्भात डॉ. विखे पाटील म्हणाले, “या सेवा पंधरवड्यात आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या वतीने घेत आहे. आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपण थांबणार नाही.” त्यांनी आमदार मोनिकाताई राजळे, सभापती शिंदे यांचा विशेष उल्लेख करत सर्वांच्या समन्वयातून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सेवा पंधरवड्याचे उद्दिष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या सेवा पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –
- शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे
- तातडीच्या समस्यांचे निराकरण कॅम्प पद्धतीने करणे
- सोशल मीडियाद्वारे पक्षाची भूमिका ठळकपणे मांडणे
- गावागावांत प्रलंबित प्रश्न सोडवून प्रशासन जनतेच्या दारी आणणे
“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न होता तो समाजोपयोगी ठरेल, हेच या सेवा पंधरवड्याचे वैशिष्ट्य आहे,” असे चव्हाण व विखे पाटील यांनी नमूद केले.