पारनेर :- आदिवासी व धनगर बांधवांच्या दळणवळणाच्या प्रश्नावरून वडगाव सावताळ गावचे चेअरमन शिवाजी रोकडे यांनी दिलेला उपोषणाचा इशारा आज जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव सावताळ ते गाजदीपूर या मार्गावर पक्का रस्ता नसल्याने गाजदीपूर येथील महिला, शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात चिखल व पाणथळ रस्त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळवणे आणि विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण होत होते.
यापूर्वी सुजित झावरे पाटील यांनी सर्व नियम बाजूला ठेवून दोन किलोमीटर पक्का रस्ता मंजूर करून दिला होता. मात्र उर्वरित रस्ता अत्यंत खराब स्थितीत राहिला असल्याने शिवाजी रोकडे यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
आज सुजित झावरे पाटील यांनी शिवाजी रोकडे, गावातील मान्यवर आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. बैठकीदरम्यान त्यांनी दोन दिवसांत गाजदीपूर रस्त्याचे भुमिपूजन करून तातडीने काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर शिवाजी रोकडे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी सुजित पाटील म्हणाले, “शिवाजी, कर्ण, राजेंद्र आपण समाजासाठी काम करत आहात, मी आपल्या पाठीशी कायम उभा आहे.” या निर्णयामुळे गाजदीपूर व परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून रस्ता काम तातडीने सुरू होण्याची अपेक्षा आहे.