कर्जमाफी झालीच पाहिजे, घेतल्याशिवाय राहणार नाही :- संतोष वाडेकर यांचा इशारा
पारनेर :– “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, यासाठी आता लढा निर्णायक होणार” अशा निर्धाराने भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पारनेर तहसील कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले.
राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्या आंदोलनाला पाठिंबा देत पारनेरमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन झाले.
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी “कर्जमाफी मिळालीच पाहिजे”, “कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शेतकऱ्यांवर सतत संकटांची मालिका चालू असून, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बाजारभावातील चढ-उतार, वीजबिलांची वसुली, अनुदानाचा अभाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी अडचणीत आहे. तरीही सरकार केवळ घोषणा करत आहे, मात्र प्रत्यक्ष कृती शून्य असल्याचा आरोप यावेळी संतोष वाडेकर यांनी केला.
तसेच, केंद्र व राज्यातील महायुती सरकारने तत्काळ निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाच्या शेवटी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह, वीजबिल माफी, पीकविमा भरपाई, खत-बियाण्यांच्या दरात घट व इतर मागण्यांचा समावेश होता.
या आंदोलनात संतोष वाबळे, सुभाष पाटील (करंजुळे), राजेंद्र करंदीकर, अविनाश देशमुख, प्रवीण खोडदे, सुरेश गोळे, नंदन भोर, मजाबापू वाडेकर, तेजस भोर, गोरख पठारे, राहुल गुंड, नारायण रोकडे, पांडुरंग पडवळ, वसंत साठे, विशाल करंजुळे, अनिल सोबले, अरुण बेलकर, जय गायकवाड, रघुनाथ मांडगे, सतीश बागल, गणेश दळवी, बाळासाहेब वाळुंज, रामदास बालवे, बबन गुंड, संभाजी वाळुंज यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.