टाकळी ढोकेश्वर परिसरातील अनेक गावांतील नागरिकांवर अन्याय; निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समस्या समोर
टाकळी ढोकेश्वर :- टाकळी ढोकेश्वर परिसरातील अनेक गावांमध्ये वृद्धापकाळ पेन्शन योजनेत लाभ घेणाऱ्या नागरिकांचे पेन्शन पगार अचानक बंद करण्यात आले आहेत. ही गंभीर बाब खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकारचे दाखले वाटप शिबिरांदरम्यान समोर आली. हे शिबीर गेल्या दोन महिन्यांपासून खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून सातत्याने आयोजित केली जात आहेत.
या शिबिरांमध्ये विविध गावांतील शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधताना वृद्ध मंडळींनी तळमळीने पेन्शन बंद झाल्याची व्यथा मांडली. या समस्येकडे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि स्वतः रवींद्र राजदेव यांनी गांभीर्याने लक्ष दिले.
रवींद्र राजदेव यांनी ही अडचण समजून घेत तातडीने संबंधित विभागांशी संपर्क साधला. पेन्शन थांबविल्यामुळे वृद्धांना होणारी गैरसोय आणि हेळसांड लक्षात घेता त्यांनी संबंधित कागदपत्रे संकलनाची प्रक्रिया सुरु केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आवश्यक दस्तावेज गोळा करून लवकरच पूर्ण अहवाल संबंधित खात्याकडे सादर केला जाणार आहे.
याबाबत रवींद्र राजदेव यांनी सांगितले की, “वृद्ध नागरिकांचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. संबंधित विभागाने जर तातडीने कार्यवाही न केल्यास आणि पेन्शनसारखा अत्यावश्यक लाभ पुन्हा सुरू न केल्यास आम्ही शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू.” तसेच या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास पारनेर तहसील कार्यालयावर सर्वच वृद्ध मंडळींना सोबत घेऊन भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा रवींद्र राजदेव यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, “रवींद्र राजदेव यांचे कार्य हे आमच्यासाठी आश्वासक ठरत आहे,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा यासाठी शासनाच्या योजना सुरु असल्या तरी अंमलबजावणीत होत असलेले अडथळे दुर्दैवी आहेत. त्यामुळे निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ प्रशासनासाठी एक स्पष्ट संदेश ठरू शकते.