तरुणांच्या प्रतिनिधित्वासाठी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत
पारनेर (प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय घडामोडींना वेग आला असून सुपा जिल्हा परिषद गटातील कडूस गावचे आदर्श व उपक्रमशील सरपंच मनोज मुंगसे यांनी येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांनी युवकांसाठी निवडणूक लढविण्याचा स्पष्ट इशारा देत राजकीय आखाड्यात सक्रियतेने प्रवेश केला आहे.
सामाजिक व राजकीय वारसा लाभलेले नेतृत्व
मनोज मुंगसे यांना समाजकार्याचे बाळकडू लहानपणापासूनच लाभले आहे. वडीलांनी भारतीय सैन्यात सेवा बजावलेली असून, चुलते माजी पंचायत समिती सदस्य होते. त्यामुळे सामाजिक जाण आणि राजकीय वारसा हे दोन्ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठळकपणे दिसून येतात. त्यांच्या नेतृत्वाखाली कडूस गावाने विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.
कडूस गावाचा चेहरामोहरा बदलणारे नेतृत्व
मनोज मुंगसे हे युवा सरपंच म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात कडूस गावाचा सर्वांगीण विकास साधण्यात आला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यांच्या प्रयत्नातून गावाने आदर्श ग्राम म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
युवकांचे प्रेरणास्थान – सुपा गटात भक्कम नेतृत्व
मनोज मुंगसे हे सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे पारनेर तालुका अध्यक्ष आहेत. या पदावर नियुक्तीनंतर त्यांनी विकासकामांचा धडाका लावत तरुणांना एकत्र करून सुपा जिल्हा परिषद गटात एक सक्षम युवा संघटनेची उभारणी केली आहे. स्थानिक तरुणांमध्ये त्यांची एक विशिष्ट पकड असून, त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी ठरत आहे.
रोजगारनिर्मितीच्या दिशेने ठोस पावले
सुपा औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनोज मुंगसे सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरुणांना स्थायिक व सुरक्षित नोकरी मिळावी यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांसोबत संवाद साधून भरती प्रक्रिया राबविल्या आहेत. भविष्यातही तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी ते काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
गावागावात विश्वासार्ह नेतृत्वाची ओळख
फक्त कडूस नव्हे, तर संपूर्ण सुपा जिल्हा परिषद गटात मनोज मुंगसे यांचे नाव एक विश्वासार्ह व कर्तबगार नेतृत्व म्हणून घेतले जाते. गटातील विविध गावांमध्ये त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज मुंगसे यांनी “ही निवडणूक युवकांसाठी आहे. मी ही निवडणूक केवळ एक सत्तासत्ता म्हणून नव्हे, तर युवकांच्या आवाजासाठी, त्यांना रोजगार, सुविधा, व स्वाभिमान मिळवून देण्यासाठी लढवतो आहे” असे स्पष्टपणे सांगत निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे संकेत दिले आहेत.
जनतेचा विश्वास, विकासाची दिशा आणि तरुणांची ताकद हाच आपला मुद्दा असणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.