समर्थक सोशल मीडियावर आक्रमक; पक्ष व अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची उत्सुकता शिगेला..!
पारनेर :- पारनेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गट व गण प्रारूप रचना नुकतीच जाहीर झाल्याने इच्छुकांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता असली तरी काही ठिकाणी बंडखोरीच्या शक्यतेने चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सुपा जिल्हा परिषद गटात माजी सभापती गणेश शेळके यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी सज्जतेची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. शेळके समर्थकांकडून सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा जोरदार प्रचार सुरू असून, गावोगावी त्यांची गाठभेट, चर्चा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
दोन वेळा पंचायत समितीचे सभापती राहिलेल्या गणेश शेळके यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण विकासाच्या कामांवर भर दिला. शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व कृषी क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क व लोकप्रियता ही त्यांच्या प्रमुख ताकदीची ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षांत पंचायत समितीमध्ये मिळवलेल्या अनुभवाचा फायदा जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या संस्थेच्या कारभारात नक्कीच होणार आहे, असे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र, गणेश शेळके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महायुती वा महाविकासआघाडी — दोन्ही बाजूंशी त्यांच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांच्या प्रवेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सद्यःस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागत असून, अंतिम गट आरक्षणानंतर उमेदवारी निश्चित होणार आहे. मात्र शेळके समर्थक जोरदार तयारीत असून, निवडणुकीसाठी मैदान उभं करत आहेत. शेळके यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी वेळ लागत असला तरी त्यांचा कल निवडणूक लढवण्याकडेच असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वावरू लागला आहे.
आता गणेश शेळके कधी निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करणार, कोणत्या पक्षाकडून तिकीट घेणार आणि त्यांच्या उमेदवारीचा तालुक्यातील समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.