मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी; शिक्षक संघटनांचेही पाठबळ
अहिल्यानगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत शाळा घेण्याच्या निर्णयाला ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून मोठा विरोध होत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण व पालकांच्या दैनंदिन कामकाजासाठी अडथळा ठरत असल्याने या निर्णयामध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी ठाम मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना पत्र पाठवले आहे.
ग्रामीण भागातील वास्तव आणि पालकांची अडचण
खा. नीलेश लंके यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात, वाड्या-वस्त्यांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या वस्तीत आहेत. येथील पालक बहुधा शेतीकामे किंवा मजुरी करत असल्याने त्यांचा मुख्य कामाचा वेळ दुपारी असतो. शाळेची वेळ ९ ते १.३० ठेवण्यात आली असता, विद्यार्थी शाळेत नेणे-आणणे हे पालकांसाठी अडचणीचे ठरते.
त्यातच अनेक गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आहे. उन्हाळ्याच्या काळात दुपारची तीव्र उष्णता लहानग्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारी ठरते. परिणामी, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कमी होत असून शिक्षणाचा दर्जाही घसरू शकतो.
शिक्षक संघटनांचेही वेळेच्या बदलाविरोधात स्पष्ट मत
जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटनांनी देखील शनिवारीची शाळा सकाळी ७.३० ते ११.३० या जुन्या वेळेतच घेण्याची मागणी सातत्याने केली आहे. शिक्षकांच्या मते, सकाळच्या वेळेत मुले ताजीतवानी असतात, त्यांचे एकाग्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शैक्षणिक उपक्रम अधिक परिणामकारकरित्या राबवता येतात. तसेच दुपारची वेळ मुलांना अभ्यास, घरगुती कामे किंवा शेतीकामांसाठी देता येते.
आरोग्यदायी आणि सर्जनशील उपक्रमांसाठी सकाळची वेळ उपयुक्त
खा. लंके यांच्या मते, शनिवारी शाळा सकाळी लवकर सुरू केल्यास विद्यार्थ्यांसाठी आरोग्यवर्धक उपक्रम – योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, शारीरिक कवायती – सुसज्ज वातावरणात घेता येतील.
त्याचप्रमाणे शासनाच्या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत कथाकथन, निबंध लेखन, हस्तकला, चित्रकला, विज्ञान प्रयोग यासारख्या सृजनशील उपक्रमांना अधिक प्रभावीपणे वेळ देता येईल.
तत्काळ वेळ पूर्ववत करण्याची मागणी
या सगळ्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आरोग्यदृष्ट्या हित लक्षात घेऊन शनिवारीची शाळा पूर्वीप्रमाणे सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट आणि ठाम मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय तातडीने रद्द करून पूर्ववत वेळ लागू करावी, अशी अपेक्षा जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.