धोत्रे खुर्द येथे ‘घर तिथे ज्ञानेश्वरी’ उपक्रम उत्साहात संपन्न
पारनेर (प्रतिनिधी) :- ज्ञानेश्वरी हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून प्रत्येक सामान्य माणसासाठी जीवनाला दिशा देणारा, अंतर्मुख करणारा आणि मनाला शांती, समाधान व सकारात्मकता देणारा आध्यात्मिक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान आत्मसात केल्याने माणूस आपल्या कर्तव्यातून मुक्त होतो आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. बाबा महाराज खामकर यांनी केले.
पारनेर तालुक्यातील धोत्रे (खुर्द) येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने ‘घर तिथे ज्ञानेश्वरी’ या अभिनव उपक्रमाचा भव्य प्रारंभ झाला. रविवारी, ६ जुलै २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाटप, प्रवचन आणि फराळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत सद्गुरु बाळूमामा भक्त मंडळ, कुमार यश भैय्या राहणे मित्रपरिवार आणि समस्त धोत्रे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या मुख्य प्रवचनात ह.भ.प. बाबा महाराज खामकर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ऐहिक व पारमार्थिक जीवनातील महत्त्व विशद केले. “ज्ञानेश्वरी ही केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही, ती आचरणात आणण्याचा ग्रंथ आहे. प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असणे म्हणजे घरात एक दिव्य प्रकाश असणे होय,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील प्रवचनाने श्रोते भारावून गेले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजी रोहकले, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, युवा नेते यशोदीप राहणे, सतीश सासवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी गावातील प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. ही आध्यात्मिक भेट गावकऱ्यांसाठी अनमोल ठरली.
प्रवचनानंतर गावातील सर्व उपस्थितांना फराळ महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ‘घर तिथे ज्ञानेश्वरी’ उपक्रमामुळे गावात धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक एकतेचा संदेश रुजला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बाळूमामा भक्त मंडळ, यश भैय्या राहणे मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यशोदीप राहणे यांनी उपस्थितांचे आभार मानत असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला साजेशी अशी ही प्रेरणादायी घटना ठरली.