“हृदय आयोग्याच्या गप्पागोष्टी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
अहिल्यानगर :– “आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधणारी सकारात्मक जीवनपद्धती आत्मसात करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी येथे केले.
मानकन्हैया ट्रस्ट व आनंदऋषी हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजयोगा जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉ. सुधाताई कांकरिया लिखित “हृदय आयोग्याच्या गप्पागोष्टी” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रा. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमात वैद्यकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
प्रा. शिंदे म्हणाले की, “हे पुस्तक केवळ हृदयरोगावर आधारित नाही, तर त्यामध्ये संपूर्ण आरोग्याचं – म्हणजेच मन, शरीर आणि आत्म्याचं – संतुलन साधणाऱ्या जीवनपद्धतीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आजच्या आधुनिक युगातही सकारात्मक विचार आणि संयमित जीवनशैलीद्वारे निरोगी जीवन जगता येऊ शकतं, याची जाणीव हे पुस्तक करून देतं.”
या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, डॉ. रतन राठोड, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुनिल म्हस्के, ब्रह्माकुमारी निर्मला दिदी, अभय आगरकर, डॉ. वसंत कटारिया, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकाच्या लेखिका डॉ. सुधाताई कांकरिया यांनी आपल्या विचारांतून आरोग्य ही केवळ शारीरिक गोष्ट नसून ती मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही विकसित केली पाहिजे, असे ठाम मत मांडले आहे. त्यांच्या कार्यामुळेच त्यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित झाल्याचा गौरवही प्रा. शिंदे यांनी यावेळी नमूद केला.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्यरित्या पार पडले. उपस्थितांनी या प्रेरणादायी पुस्तकाचे आणि डॉ. कांकरिया यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.