विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा गौरव; दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड
अहिल्यानगर :– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हिवरेबाजार (ता. पारनेर) येथे आयोजित वृक्षारोपण सोहळा व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. राम शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर हिवरेबाजार ग्रामस्थांनी त्यांचा पहिल्यांदाच सार्वजनिक सत्कार केल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
प्रा. शिंदे यांनी हिवरेबाजारमध्ये राबवण्यात येत असलेल्या दुर्मिळ देशी वृक्ष लागवड उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि वृक्षारोपण करून निसर्गसंवर्धनाच्या संदेशाला बळकटी दिली. या वेळी बोलताना त्यांनी हिवरेबाजारच्या विकास कार्याची भरभरून प्रशंसा केली. “हिवरेबाजारने जलसंधारण, सामाजिक समता व ग्रामविकासाच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे गाव प्रेरणास्थान ठरले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार, आमदार काशिनाथ दाते, सरपंच विमलताई ढाणगे, ज्येष्ठ नेते वसंतराव चेडे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष दुधाडे, अमोल मैड यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी व राज्यातील ४० गावांमधून ‘आदर्शगाव’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले ७० प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून हिवरेबाजारमध्ये मागील २६ वर्षांपासून दुर्मिळ देशी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत गावात १८७६ दुर्मिळ वृक्षांची लागवड विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे निसर्गसंवर्धनाबरोबरच पर्यावरण जागृतीलाही चालना मिळत आहे.
कार्यक्रमाच्या अखेरीस प्रा. राम शिंदे यांनी “हिवरेबाजारसारख्या प्रेरणादायी भूमीत सत्कार होणे ही अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद बाब आहे,” असे सांगत ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
हिवरेबाजारच्या ग्रामविकासाच्या वाटचालीला अधिक बळ मिळावे आणि इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.