web analytics
---Advertisement---

श्रीरामपूरमध्ये २२०/३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनाने औद्योगिक विकासास गती :- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

On: Sunday, July 13, 2025 7:11 PM
---Advertisement---

उद्योगांना दर्जेदार व भरपूर वीजपुरवठ्याचा दिलासा, एमआयडीसी परिसराचा कायापालट अपेक्षित

शिर्डी :- श्रीरामपूर तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासात अडथळा ठरत असलेल्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन आज श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

सुमारे ५९ कोटी ६२ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे श्रीरामपूर तालुका व आसपासचा एमआयडीसी परिसर, बेलापूर, भोकर, नायगाव, हरेगाव, सुतगिरणी, शिरसगाव, उक्कलगाव, मातापूर आणि सन फ्रेश कंपनी या भागातील वीजदाबाची दीर्घकाळची समस्या सुटणार आहे.

या कार्यक्रमात आमदार हेमंत ओगले, महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, अशोक मडावी, हादी खान, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, नितीन दिनकर, दीपक पठारे, नानासाहेब शिंदे, सचिन गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचा विश्वास : वीजसंकटावर कायमचा तोडगा

या उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, “श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग आजपर्यंत कमी वीजदाबामुळे अडचणीत होते. नव्या उपकेंद्रामुळे शेती आणि उद्योग दोन्ही क्षेत्रांना पुरेशा क्षमतेने व अखंड वीजपुरवठा होईल. यामुळे तालुक्यातील उद्योगवाढीस बळ मिळेल व स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या उपकेंद्रासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य विजेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून, ६५ हजार मेगावॅट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्प, ४० टक्के कृषी फिडर सौरऊर्जेवर आणण्याचा संकल्प व नेट मीटरिंगद्वारे घरगुती ग्राहकांनाही फायदा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणावर १ लाख कोटींचा भर – शासनाची कृतीशीलता

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाती घेतलेल्या जलसंधारण योजनांचा उल्लेख करताना विखे पाटील म्हणाले की, “गोदावरी-जायकवाडी प्रकल्प, पाण्याचे पुनर्वहन, भंडारदऱ्यातील अतिरिक्त पाणी अशा योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. भाषणं व मोर्चे न काढता प्रत्यक्ष कामे करून दाखवणे हेच आमचे धोरण आहे.”

आ. हेमंत ओगले : ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडची समस्या मिटणार

कार्यक्रमात आमदार हेमंत ओगले यांनीही उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “सध्या श्रीरामपूर तालुक्यात वीजपुरवठा बाभळेश्वर व नेवासा तालुक्यांतून होत असल्याने ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होतात व शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. या नव्या उपकेंद्रामुळे ही समस्या संपेल व एमआयडीसीमध्ये नव्या उद्योगांची वाढ होईल.”

महाट्रान्सकोकडून एक वर्षात काम पूर्ण

या प्रकल्पाची कामे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी (महाट्रान्सको) मार्फत एक वर्षात पूर्ण केली जाणार आहेत.

श्रीरामपूर औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने

या उपकेंद्रामुळे श्रीरामपूर तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्राला बळ मिळेल, स्थानिक रोजगार वाढेल आणि वीजसंपत्तीचा अधिक परिणामकारक वापर होईल. सरकारचा प्रत्यक्ष कामावर विश्वास असल्याचे या प्रकल्पातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे यांनी केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment