शहराच्या प्रगतीसाठी जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे धोरणात्मक निर्देश
शिर्डी :- “शहराचा खरा विकास पायाभूत सुविधांच्या सशक्त आधारेच शक्य आहे. श्रीरामपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर प्राधान्य दिले जाणार आहे,” असे स्पष्ट मत राज्याचे जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक किरण सावंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
शहर विकासासाठी १७८ कोटींची पाणीपुरवठा योजना
श्रीरामपूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी १७८ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. “या कामांची गुणवत्ता अबाधित राहावी यासाठी खासगी एजन्सीमार्फत पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली जावी,” असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
३ हजार घरकुलांचा भव्य प्रकल्प
शेती महामंडळाच्या उपलब्ध जमिनीवर ३ हजार घरकुलांचे भव्य प्रकल्प उभारले जाणार असून त्यात सर्व मूलभूत नागरी सुविधा पुरविल्या जातील. “हा प्रकल्प राज्यातील सर्वोत्तम घरकुल प्रकल्प ठरेल,” असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अतिक्रमण हटवून नवे पर्यावरण पूरक विकास
नॉदर्न ब्रॅंच कालव्यावरील अतिक्रमणे हटवून कालवा भूमिगत केला जाईल. प्रवरा डावा कालव्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून परिसराचे सौंदर्यीकरण करून व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. अवैध पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी विशेष घोषणा
शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण न करता तो अभिमानाचा विषय मानावा, असे सांगत पालकमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशीही ग्वाही दिली.
नवीन उपाययोजना व तंत्रज्ञानाचा वापर
शहर स्वच्छतेसाठी घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली लावण्याचे निर्देश देत पालकमंत्र्यांनी, पाणीपट्टी व घरपट्टी ऑनलाइन भरणा व्यवस्था सुरु करण्यास सांगितले.
तसेच अतिक्रमण हटवणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन, संपूर्ण शहर सीसीटीव्ही निगराणीत आणणे, आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण अशा उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
सहभागातून विकासाची दिशा
शहरातील व्यापारी, उद्योजक यांनी देखील श्रीरामपूरच्या विकासात सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन करत पालकमंत्र्यांनी रस्त्यांवरील भाजीपाला विक्री टाळण्यासाठी एकात्मिक भाजी मार्केट स्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले.
शहरवासीयांच्या अडचणी जाणून घेतल्या
या बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी शहरातील विविध भागातील नागरिकांच्या अडचणी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
श्रीरामपूरच्या भविष्यकालीन विकासाची दिशा निश्चित करणाऱ्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की शासनाचा मुख्य उद्देश हा नागरी जीवनमान उंचावणाऱ्या, नियोजनबद्ध आणि जनतेच्या हिताच्या योजनांना गती देण्यावर आहे.