नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू; खासदार नीलेश लंके यांचे उपोषण मागे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात खासदार नीलेश लंके यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेला यश मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानुसार ठेकेदाराने प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे, तसेच ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने खा. लंके यांनी आपले बेमुदत उपोषण शनिवारी सायंकाळी मागे घेतले.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनाची सांगता
खा. लंके यांना देण्यात आलेल्या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे की, आंदोलनाची दखल घेऊन ठेकेदाराला काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे काम, शनिशिंगणापूर फाटा येथे मिलिंगचे काम तर मौजे देहरे येथे अंडरबायपासचे काम सुरू करण्यात आले. याशिवाय मौजे कणगर आणि पिंपरी निर्मळ येथे प्लांट उभारणी, यंत्रसामग्री आणि लॅबोरेटरी उभारणीचे काम देखील सुरू असल्याचे नमूद करण्यात आले.
खा. लंके यांचे सहकारी ठामपणे मैदानात
प्रकल्प संचालक पंदरकर यांनी शुक्रवारी सायंकाळीच ठेकेदाराला काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, शनिवारी सकाळपासून खा. लंके यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याच्या विविध टप्प्यांवर जाऊन कामाची प्रत्यक्ष पडताळणी केली. काम सुरु असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर खा. लंके यांनी लेखी आश्वासनाचा आधार घेत आंदोलन मागे घेतले.
ठेकेदारावर होणार दंडात्मक कारवाई
लेखी आश्वासनात प्रकल्प ठेकेदाराने काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. जर ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाले, तर ठेकेदारावर नियमोचित दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुदतवाढीचा प्रश्नही निकाली
खा. लंके यांनी यावेळी स्पष्ट मागणी केली की, जर ठेकेदाराने पुन्हा काम रखडवले, तर त्याला मुदतवाढ दिली जाणार नाही. ही मागणी मान्य करून लेखी आश्वासनात “ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले.
खा. लंके यांची ठाम भूमिका, जनतेच्या हितासाठी उभारलेले आंदोलन आणि प्रशासनावर टाकलेला दबाव यामुळे अखेर नगर-मनमाड रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. हा यशस्वी लढा आता तालुक्याच्या विकासाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.