web analytics
---Advertisement---

गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी – खा. नीलेश लंके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाम मागणी

On: Saturday, July 12, 2025 5:21 PM
---Advertisement---

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके ऍक्टिव्ह मोडवर…

अहिल्यानगर :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गट व गण रचना २०१७ सालच्या स्वरुपातच कायम ठेवावी, अशी ठाम आणि स्पष्ट मागणी अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात खा. लंके यांनी नमूद केले आहे की, सन २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या गट व गण रचनेच्या आधारेच त्या वर्षी निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर नव्याने कोणताही गट अथवा गण तयार करण्यात आलेला नसल्यामुळे फेररचना करण्याचे कारणच उरत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सद्यस्थिती कायम ठेवण्याची गरज आहे.

निवेदनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, गट व गण रचना ही राजकीय हस्तक्षेपातून प्रभावित होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा प्रकारे जर रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला, तर निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता धोक्यात येऊ शकते. हे रोखण्यासाठी प्रशासनाने सजग राहणे आवश्यक आहे, असे खा. लंके यांनी स्पष्ट केले.

खा. लंके यांनी सांगितले की, गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवल्यास सामाजिक समता, राजकीय स्थैर्य आणि सर्वसमावेशकता टिकून राहील. कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुका जवळ आल्याने या विषयाला जिल्ह्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून या निवेदनावर कोणती भूमिका घेण्यात येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पारदर्शक व न्याय्य निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ही बाब स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, आगामी निवडणूक राजकारणाच्या घडामोडींवर मोठा परिणाम करू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment