खासदार निलेश लंके यांच्या ठाम आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा; प्रशासनाची धावपळ सुरू
अहिल्यानगर :- नगर-मनमाड महामार्गावरील ७५ किलोमीटर अंतराचा रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी, जिल्हाभरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची त्यांची ठाम भूमिका कायम असून यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन महिन्यांपासून रखडलेले काम
खा. लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर कामासाठी निविदा प्रसिद्ध झाली आणि एप्रिल महिन्यात कार्यारंभ आदेशही देण्यात आला. मात्र दोन महिने उलटून गेले तरी प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने, लोकहितासाठी खा. लंके यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही ठोस कारवाई न झाल्यामुळे त्यांनी ११ जुलैपासून आंदोलन सुरू केले.
जिल्हाभरातून पाठिंबा वाढतोय
शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राहुरी, राहाता, कोपरगाव परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिर्डीतील पदाधिकारी आणि व्यापारी वर्गाने आंदोलनस्थळी भेट देऊन खा. लंके यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. फक्त रस्त्याच्या दुरवस्थेने बाधित भागांपुरतेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक या प्रश्नाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी आंदोलनस्थळी येऊन ऐक्य व्यक्त केले.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नगर शहरातील व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नगरमध्ये वास्तव्यास असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी खा. लंके यांना भेटून आंदोलनाला पाठींबा दिला. पहाटे उशिरा लंके यांनी आंदोलनासाठी उभारलेल्या मंडपात थोडी विश्रांती घेतली. दिवसा व रात्री पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून मनधरणीचा प्रयत्न
शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, कार्यकारी अभियंता प्रशांत बेरड आणि रस्त्याचे ठेकेदार यांनी खा. लंके यांची भेट घेऊन काम लवकरच सुरू होईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र लंके यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत, “दोन महिने झाले, तरी काम का सुरू झाले नाही? तुमची यंत्रणा तयार आहे का?” असा थेट सवाल ठेकेदाराला केला. यावर ठेकेदाराकडे समाधानकारक उत्तर नव्हते, त्यामुळे खा. लंके यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.
खा. भाऊसाहेब वाघचौरे यांचाही पाठिंबा
दरम्यान, दिल्लीमध्ये उपस्थित असलेले खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी खा. नीलेश लंके यांच्याशी संपर्क साधत, “मी तुमच्या आंदोलनासोबत आहे,” असे सांगितले. यासोबतच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे लंके यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
डॉक्टरांच्या पथकाकडून वैद्यकीय तपासणी
शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी खा. लंके यांची वैद्यकीय तपासणी केली. उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
खा. नीलेश लंके यांच्या या ठाम आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्ह्याच्या सर्व स्तरांतून पाठिंबा वाढत आहे. पुढील काही दिवसांत प्रशासनाकडून प्रत्यक्ष काम सुरू होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.