शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि आधुनिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी नव्या योजना राबविणार…
पारनेर (प्रतिनिधी) :- वडगाव सावताळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी रोकडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून, या निवडीने स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या सुजित झावरे पाटील गटाने सेवा सोसायटीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
ही निवड जाहीर झाल्यानंतर गावात मोठा उत्साह दिसून आला. नवनिर्वाचित चेअरमन शिवाजी रोकडे यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व गावातील लोकप्रिय नेते सुजितराव झावरे पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रोकडे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी चेअरमन कर्ण रोकडे, माजी सरपंच भाऊसाहेब सैद, गणेश खंडाळे, संदीप खंडाळे, पोपट बर्वे, ठकाजी सरोदे, दिलीप पाटोळे, शरद गागरे, सुनील गांगड, शिवाजी शिंगोटे, डी. पी. शिंदे आदींसह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी रोकडे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी यापूर्वीही गावातील विविध उपक्रमांत सहभाग घेतला आहे. सुजित झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे.
सुजितराव झावरे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “शिवाजी रोकडे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव सावताळ सेवा सोसायटी अधिक प्रभावीपणे काम करेल. गावातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि आधुनिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी नव्या योजना राबविण्यात येतील. सोसायटीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.”
वडगाव सावताळ सेवा सोसायटी ही तालुक्याच्या उत्तर भागातील एक महत्त्वाची संस्था मानली जाते. शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी ही संस्था प्रभावी भूमिका बजावत असून, नव्या नेतृत्वाकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
या निवडणुकीत मिळालेले यश हे जनतेने दाखवलेला विश्वास असल्याचे शिवाजी रोकडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले. “हा विश्वास कायम राखत आम्ही सर्वांच्या सहकार्याने पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी नवनिर्वाचित टीमला शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी यशस्वी भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.