गुरुपौर्णिमा उत्सवाने पानोलीत अध्यात्मिक वातावरणात नांदले भक्तीमय क्षण
पारनेर | पानोली :- गुरु-शिष्य परंपरेचा महिमा अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा माऊली वारकरी शिक्षण संस्था, पानोली येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. अध्यात्म, संस्कार आणि शिक्षण यांचे त्रिसूत्री संकल्प घेवून कार्यरत असलेल्या या संस्थेत आयोजित कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुपूजनाने झाली. गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांना वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी गुरुवचन स्वीकारून आपले जीवन घडवण्याचा निर्धार केला. या भावपूर्ण क्षणांनी परिसराचे वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थ्यांनी बाल कीर्तनकार ह.भ.प. शुभेच्छाताई वारे यांचे प्रेरणादायी प्रवचन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि अध्यात्मिक विचारांनी वातावरणात भक्तिरस साकार झाला.
या दिवशी महाप्रसादाचेही भव्य आयोजन करण्यात आले होते. हरिभाऊ थोरात, रामदास थोरात, अनिल थोरात आणि राजमाता परिवार यांच्या सौजन्याने सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिभावाने परिपूर्ण असलेल्या या महोत्सवात ऐक्य सेवा सेंटरचे अध्यक्ष तुकाराम वाखारे, राजमाता परिवाराचे डॉ. रामचंद्र थोरात, पानोलीचे सरपंच संदीप गाडेकर, संस्थेच्या संस्थापक ह.भ.प. पूजाताई शिंदे महाराज, अध्यक्ष ह.भ.प. सुहास महाराज शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काळे सर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
माऊली वारकरी शिक्षण संस्था ही पानोलीसारख्या ग्रामीण भागात अध्यात्म आणि शिक्षण यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी कार्यरत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर अध्यात्मिकतेतही अग्रेसर आहेत.
या गुरुपौर्णिमा सोहळ्यामुळे गुरु-शिष्य परंपरेचा गौरव झाला असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता व आध्यात्मिक जाणीव निर्माण झाल्याचे समाधान संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम अध्यात्मिक उर्जा आणि सकारात्मकतेने भारलेला होता.