शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार काशिनाथ दाते यांचा पुन्हा सरकारला सवाल..!
पारनेर :- पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. काशिनाथ दाते यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत ठामपणे आवाज उठवला. औचित्याच्या मुद्यावर भाष्य करत त्यांनी बोगस बियाणे विक्रीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मुद्दा जोरदारपणे मांडला आणि शासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.
बाजरी बियाण्यामुळे शेतकऱ्यांचा फटका
मे महिन्यात अवकाळी पावसानंतर पारनेर तालुक्यातील वासुंदे, वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, कासारे, कर्जुले हर्या, तिखोल, काकणेवाडी, गारगुंडी आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने बाजरीची पेरणी केली. मात्र बाजारातून विकत घेतलेले बियाणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले आणि बहुतांश शेतजमिनींमध्ये उगमच झाला नाही.
या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच वेळ, पैसा आणि मेहनत वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ओझं वाढलं असून मानसिक तणावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
कांदा बियाण्यातही फसवणुकीचा प्रकार
दाते सरांनी विधानसभेत आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला — कांदा बियाण्याच्या नावाखाली दलालांकडून सुरू असलेली लूट. तालुक्यात काही बोगस विक्रेते चढ्या भावाने बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा :- आमदार दातेंची मागणी
या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या, वितरक व दलाल यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना द्यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल राखले जावे, ही त्यामागील भूमिका होती.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर नेता :- आमदार दातेंची प्रतिमा अधिक भक्कम
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार काशिनाथ दाते यांनी या वेळीही आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत पोहचवून सच्च्या जनतेच्या नेत्याची भूमिका बजावली. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे विधानसभेचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले गेले असून शासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा निर्माण झाली आहे.
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांचे नुकसान भरून निघावे आणि पुन्हा एकदा त्यांच्या जीवनात नव्याने आशा निर्माण व्हावी, यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी घेतलेली ही भूमिका निश्चितच प्रेरणादायी आणि शेतकरीहिताची ठरते.