जिल्हा परिषद शाळेच्या कायापालटासाठी लोकसहभागातून पुढाकार; पत्रा शेड कामाचा शुभारंभ
पारनेर :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गावात शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत उल्लेखनीय कार्य सुरू केले आहे. गावात लोकसहभागातून विकासाची नवी दिशा ठरावी, या हेतूने सावताळ बाबा देवस्थान आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची गती वाढवून वडगाव सावताळ गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे (बी. डी. दादा) यांनी व्यक्त केला.
वडगाव सावताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकसहभागातून कायापालट करण्यात येत आहे. या शाळेच्या विकासासाठी माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी आर्थिक आणि वस्तुरूपात मोठी मदत केली आहे. विशेषतः शाळेतील पत्रा शेड उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य दिले. या कामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते नारळ वाढवून पार पडले.
या कार्यक्रमात गावातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब शिंदे होते. यावेळी सरपंच संजय रोकडे, माजी सरपंच राजेंद्र रोकडे, चेअरमन शिवाजी रोकडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खंडाळे, माजी चेअरमन बाबासाहेब दाते, अर्जुन रोकडे, मंगेश रोकडे, योगेश शिंदे, भाऊ शिंदे, सर्जेराव रोकडे, धनंजय शिंदे, निवृत्ती शिंदे, गोरक्ष रोकडे, भाऊसाहेब रोकडे, दादाभाऊ रोकडे, अशोक रोकडे (मेजर), अशोक रोकडे (गुरुजी), गोरख वाणी, बाबासाहेब लोखंडचूर, भाऊ जांभळकर, पंढरीनाथ व्यवहारे, संदीप व्यवहारे, नामदेव रोकडे (गुरुजी), दत्तात्रय शिंदे, अण्णासाहेब दाते, ठकाजी रांधवन, सुदाम व्यवहारे, आप्पासाहेब तिखोळे, धोंडीभाऊ तिखोळे, बाजीराव पवार, रामदास तिखोळे, सुनील रोकडे, नारायण रोकडे आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, “गावाच्या प्रगतीसाठी लोकसहभाग हा खरा विकासाचा पाया आहे. शाळा हे भविष्याचे केंद्र आहे. या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा निर्माण होणे आवश्यक असून, यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतल्यास अनेक अडचणी सहज दूर होतात.”
शाळेच्या विकासात माजी सरपंच शिंदे यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या पुढाकाराचे आणि मदतीचे गावकऱ्यांनी एकमुखाने कौतुक केले. या उपक्रमामुळे गावात सामाजिक एकोपा, सलोखा आणि विकासाची नवी दिशा निश्चितच दिसून येत आहे. वडगाव सावताळच्या ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि विकासासाठीची भावना तालुक्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.