खासदार निलेश लंके यांचे बेमुदत उपोषण सुरू; नगर-मनमाड रस्त्याच्या कामाची तातडीने मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील विळद बायपास ते सावळी विहीर या सुमारे ७५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. सहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे हजारांहून अधिक बळी गेल्याचा मुद्दा उपस्थित करून, काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याची ठाम भूमिका खा. लंके यांनी घेतली आहे.
या उपोषणास खासदार लंके यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपोषणस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त :- खासदार निलेश लंके
उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना खा. नीलेश लंके म्हणाले, “२०१८ पासून या रस्त्याचे काम रखडले आहे. दरवेळी केवळ घोषणा आणि नव्या तारखांची घोषणा होते, पण प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.”
“गेल्या चार वर्षांत रस्त्यावरील अपघातांमध्ये ३८८ जणांनी घटनास्थळीच प्राण गमावले आहेत. जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावलेल्यांची संख्या धरली, तर मृतांची संख्या १,००० हून अधिक होते. या गंभीर स्थितीकडे प्रशासन आणि सरकारने दुर्लक्ष केले आहे, हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
एप्रिलमध्ये वर्क ऑर्डर, पण काम सुरुच नाही
खा. लंके यांनी स्पष्ट केले की, एप्रिल २०२५ मध्ये या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, पावसाचा हवाला देत काम पुढे ढकलले जात आहे. “हा प्रकार म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळण्यासारखा आहे. पावसाळ्याच्या तोंडावर काही ठिकाणी थातुरमातुर डागडुजी सुरू आहे, पण प्रत्यक्षात मुख्य कामाची गती अजूनही दिसत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
अधिकाऱ्यांची समजूत निष्फळ
खा. लंके यांच्या उपोषणाची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी भेटीस आले. त्यांनी हवामानाच्या कारणास्तव दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगितले. मात्र, खा. लंके यांनी याला विरोध करत, “काम सुरू करा, अन्यथा मी उपोषण मागे घेणार नाही,” असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांची समजूत कशीही यशस्वी ठरली नाही.
रस्ता चार आमदार, दोन खासदारांच्या मतदारसंघातून जातो – तरीही दुर्लक्ष
“या रस्त्याचा संबंध जिल्ह्यातील चार आमदार आणि दोन खासदारांच्या मतदारसंघाशी असूनही गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्ण झालेला नाही, हे सरकारच्या आणि प्रशासनाच्या अपयशाचे प्रतिक आहे,” असे खा. लंके म्हणाले.
नगर-मनमाड रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने धावतात. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.