श्री.स्वामी समर्थांच्या कृपेने विकासकामांना मिळणार अधिक गती :- सुजित झावरे पाटील यांचे आश्वासन
माळकुप :- गुरुपौर्णिमेनिमित्त माळकुप येथील श्री.स्वामी समर्थ मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक आणि श्रद्धेने परिपूर्ण असा सोहळा पार पडला. याच प्रसंगी श्री. स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५ लाख रुपयांच्या काँक्रीटीकरण कामाचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, उपाध्यक्ष, श्री. स्वामी समर्थ सेवेकरी मंडळाचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात “स्वामी समर्थ महाराज की जय” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले, “श्री. स्वामी समर्थांच्या कृपेनेच आजपर्यंत जनसेवा करण्याची संधी मिळत आहे. यापुढील काळातही ही सेवा अखंडपणे चालू राहील, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसर काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्यातही या देवस्थानासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. स्वामी समर्थ मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच तत्पर राहील.”
या मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेला तसेच विविध धार्मिक उत्सवांना हजारो भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे परिसरात आवश्यक सोयी-सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक होता. सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने या कामाला गती मिळाल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाचे संयोजन गावातील सेवा मंडळ व स्थानिक ग्रामस्थांनी उत्कृष्ट प्रकारे पार पाडले. या विकासकामांच्या माध्यमातून माळकुप ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानाचा विकास होत असून, गावाचा धार्मिक व सांस्कृतिक चेहराही अधिक उजळणार आहे.