अहिल्यानगर ते सावळीविहीर रस्ता आणि शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती; कुंभमेळ्यापूर्वी पूर्णत्वाचे आदेश
अहिल्यानगर, दि. १० (प्रतिनिधी):- अहील्यानगर ते सावळीविहीर रस्त्याचे काम कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे तसेच शेवगाव बाह्यवळण रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली घेण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यावेळी अहील्यानगर ते सावळीविहीर रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे ५१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट आदेश दिले की, रस्त्याचे काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
शेवगाव शहरातून मराठवाड्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत व अडथळे-मुक्त व्हावी यासाठी २२.६०२ कि.मी लांबीचा शेवगाव बाह्यवळण रस्ता विकसित केला जाणार आहे. यासाठी ५६.१९१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, याकरिता सुमारे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी सादर करण्यात आला आहे.
या रस्त्याच्या प्रकल्पात भूसंपादन, निधीचे व्यवस्थापन आणि चौपदरी रस्त्याच्या दृष्टीने आराखड्याचे पुनरावलोकन यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती बैठकीत मांडली. यापूर्वी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या आराखड्याला अंतिम स्वरूप मिळाले होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील व मंत्री भोसले यांनी दोन्ही रस्ते प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे असावेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही रस्ते स्थानिकांसह लाखो भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून कामात गती आणून ते वेळेत पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.