डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; मात्र खासदार निलेश लंकेंकडून श्रेय ‘लाटण्याचे’ राजकारण सुरूच..!
वाळकी | प्रतिनिधी :- पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी व बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या डीपीआरचा (सविस्तर प्रकल्प अहवाल) सर्वेक्षण पूर्ण होऊन तो रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे एक मोठं पाऊल टाकलं गेलं आहे. मात्र या यशाचे श्रेय घेण्यावरून राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे.
या प्रकल्पासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सातत्याने संसद अधिवेशनात आवाज उठवला, दिल्ली दरबारात पाठपुरावा केला, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेतली. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या डीपीआरच्या तयारीस मंजुरी दिली, आणि आज ती प्रत्यक्षात सादर होण्यापर्यंत मजल मारली आहे.
मात्र या महत्त्वाच्या यशावर सध्याचे खासदार निलेश लंके यांनी ‘श्रेय’ घेण्याचे राजकारण सुरू केल्याचा आरोप भाजपाच्या जिल्हा नेतृत्वाकडून करण्यात आला आहे. याबाबत बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले, “खासदार लंके यांनी यावेळी तरी मूळ प्रयत्नकर्त्यांचा सन्मान करावा. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा मोह टाळून वस्तुस्थिती स्वीकारावी, हीच अपेक्षा आहे.”
शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी देखील यासंदर्भात नाराजी व्यक्त करत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आज हा प्रकल्प पुढे सरकत आहे. लंके यांनी स्वतःचे श्रेय घेण्यापेक्षा या प्रयत्नकर्त्यांचे आभार मानावेत.”
भालसिंग पुढे म्हणाले, “डॉ. विखे यांनी या प्रकल्पाची वेळोवेळी गरज अधोरेखित करत दिल्लीत मंत्र्यांशी चर्चा केली. रेल्वेमंत्री वैष्णव यांनीदेखील या मार्गिकेच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे ही केवळ राजकीय नौटंकी न करता, वास्तविक योगदान ओळखण्याची ही वेळ आहे.”
पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाच्या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याने हा मार्ग सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुळात ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली, त्यांचा सन्मान करणे अपेक्षित आहे, असा सूर भाजपने घेतला आहे.