विकास (विशाल) कळमकर यांची जनता दल (सेक्युलर) पारनेर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती; अहिल्यानगरातील शेकडो तरुणांचा पक्षात उत्स्फूर्त प्रवेश
पारनेर :- तालुक्यातील कळमकरवाडी गावचे युवा नेतृत्व विकास उर्फ विशाल कळमकर यांची जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हाध्यक्ष संजयजी बारवकर आणि प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नियुक्ती सोहळा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात अहिल्यानगर व परिसरातील शेकडो तरुणांनी जनता दल (से) पक्षात मोठ्या उत्साहात जाहीर प्रवेश केला. नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी आणि सामाजिक प्रश्नांवर लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे, विकास कळमकर यांना पक्षात सामील होताच थेट पारनेर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे म्हणाले, “पक्षवाढ ही केवळ संख्यात्मक नसून मूल्याधारित असली पाहिजे. विकास कळमकर यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा गावपातळीवर रुजवली जाईल. तरुण कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी एकनिष्ठ राहून कार्य केले पाहिजे.”
विकास कळमकर यांनी आपल्या मनोगतातून तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न, विशेषतः शेतकरी, युवक, महिला व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा संकल्प व्यक्त केला. “मी पक्षाच्या आदेशानुसार संघटन बळकट करण्यासाठी आणि लोकहितासाठी कार्यरत राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्याला कुडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे, सरचिटणीस मनोज माळवे, अजिनाथ बर्वेकर, ओंकार माळवे, सचिन गुळे, पांडुरंग पवार, रोहित शेंबे, सुरेश जाधव, निखिल कुटे, विजय पवार, गणेश कुटे, टिळक कुटे, दुगार भोसले, शुभम सायकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची संपूर्ण मांडणी आणि नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी होते. नवनियुक्त अध्यक्षांभोवती कार्यकर्त्यांनी एकवटत, तालुक्याच्या राजकीय वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण केल्याचे या वेळी दिसून आले.
या नियुक्तीमुळे पारनेर तालुक्यात जनता दल (सेक्युलर) पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात पक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे.