सुजित झावरे पाटील करणार रस्ता रोको आंदोलन..!
नगर-कल्याण रस्त्याच्या कामाने घेतले अनेकांचे बळी; लोकांचा प्रचंड उद्रेक..!
आई-बापाचा आधार गेला; एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला – नगर-कल्याण रस्त्यावर पुन्हा एक बळी
ढोकी (ता. पारनेर) | प्रतिनिधी :- नगर-कल्याण रस्त्यावर पुन्हा एक जीव गमावण्याची दु:खद घटना समोर आली असून ढोकी गावातील प्रणव धरम या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो घरचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांत संतापाची भावना निर्माण झालेली आहे.
या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून सात जणांचा जीव गेला आहे. शेकडो लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेवर वारंवार प्रशासन, संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्याकडे लेखी निवेदने देऊन लक्ष वेधले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता त्यांनी थेट रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
♦️काम सुरु असले तरी धोका कायम!
सदर रस्ता सध्या सिमेंट रस्त्यात रूपांतरित केला जात आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे काम सुरु होणे बाकी आहे. मात्र पूर्ण न झालेले रस्त्याचे काम आणि त्यातून बाहेर आलेले लोखंडी गज व इतर अडथळे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हेच अडथळे सात जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत.
♦️प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष
सुजित झावरे पाटील यांनी या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन यांना जबाबदारीची जाणीव करून देत योग्य उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र या सूचना दुर्लक्षित झाल्या आणि परिणामी आज आणखी एका युवकाचा बळी गेला.
♦️आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही :- सुजित झावरे पाटील
या पार्श्वभूमीवर बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले, “आम्ही शांततेच्या मार्गाने अनेक वेळा आवाज उठवला. अनेक पत्रव्यवहार केले. मात्र सात निष्पाप जीव गेल्यावरही जर प्रशासन झोपेतच असेल, तर आम्हाला रस्ता रोकोसारखा आंदोलनात्मक मार्ग अवलंबावा लागेल. आता आणखी कोणाचाही बळी जाऊ नये, म्हणूनच हा टोकाचा निर्णय घेतला आहे.”
♦️नागरिकांची मागणी – रस्ता कामाची तातडीने चौकशी व सुधारणा व्हावी!
सदर अपघातानंतर स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व अनेक संघटनानी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रस्त्यावर सुरु असलेल्या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून सुरक्षेची खबरदारी घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
♦️ रस्ता रोको आंदोलनाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकांचा उद्रेक अटळ – जनतेचा इशारा!
आता प्रशासनाने तात्काळ सुधारणा करून रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून अपघात होणार नाहीत यावर कार्यवाही करणे गरजेचे असून सुजित झावरे पाटील यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याने आता तरी प्रशासनाला जाग यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असून पुढील परिस्थितीला प्रशासन जबाबदार असणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.