डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने साकत खुर्द येथे शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न
नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, विळद घाट यांच्यातर्फे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत दिनांक ३० जून २०२५ रोजी भव्य शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर, साकत खुर्द (ता. व जिल्हा – अहिल्यानगर) येथे पार पडले.
या चर्चासत्राला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या उपसरपंच मा. सौ. मीना बाबासाहेब चितळकर होत्या. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपकृषी अधिकारी मा. श्री. बाळासाहेब काकडे (पाथर्डी), सहाय्यक कृषी अधिकारी श्री. वसंत भोईटे (साकत खुर्द), डॉ. डी. पी. मावळे (सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, विळद घाट), आणि विशाल कंपनीचे प्रतिनिधी श्री. सचिन चिलघर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीत मंडळ कृषी अधिकारी मा. श्री. नारायण करांडे (वाळकी), महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी – श्री. दत्तु चितळकर, यादव वाघमोडे, जितेंद्र कारले, गणेश जाधव, बाबासाहेब चितळकर, भीमा शिंदे, संपत वाघमोडे, रामदास चितळकर, तात्याभाऊ वाघमोडे, भरत वाघमोडे, केरभाऊ वाघमोडे, उद्धव शिंदे, सुभाष चितळकर, राहुल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चर्चासत्रात उपकृषी अधिकारी श्री. बाळासाहेब काकडे यांनी कांदा बीजोत्पादनाविषयी सखोल मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचे निरसन केले. श्री. वसंत भोईटे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले.
डॉ. डी. पी. मावळे यांनी मृदासंवर्धन, जलसंधारण आणि सेंद्रिय घटकांचे महत्त्व अधोरेखित करत शाश्वत शेतीच्या दिशेने शेतकऱ्यांनी वाटचाल करण्याचे आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी मा. श्री. नारायण करांडे यांनी जैविक शेतीचे फायदे स्पष्ट करत पारंपरिक शेतीच्या तुलनेत ती अधिक लाभदायक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे महाविद्यालयाचे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्लापुरे आणि प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिकन्या कु. श्वेता टकले यांनी तर आभार प्रदर्शन प्रगतिशील शेतकरी श्री. दत्तु चितळकर यांनी केले.
या चर्चासत्राचे यशस्वी आयोजन कृषिकन्या कु. अनुराधा चोभे, शुभांगी मोहिते, प्रिया नऱ्हे, शिवानी नन्नवरे आणि शालोम साळवे यांनी मेहनतीने पार पाडले.
शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना आधुनिक व शाश्वत शेतीकडे वळवण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश या चर्चासत्रातून साध्य झाला, असे मत सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केले.