धक्कादायक! आजारपणाला कंटाळून पित्यानेच केली लेकीची हत्या
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथे एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका जन्मदात्या बापाने दारूच्या नशेत आपल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला आहे. या घटनेनंतर आरोपी पित्याने तब्बल २४ तास मुलीचा मृतदेह घरातच ठेवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर जाधव असे आरोपी पित्याचे नाव आहे. त्याची मुलगी वारंवार आजारी पडत असल्याने आणि सायकलवरून पडल्याच्या रागातून त्याने हा अमानुष प्रकार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. मुलीचा खून केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहावर हळदी-कुंकू टाकले आणि मृतदेह घरातच ठेवला.
या घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधवला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, एका निष्पाप चिमुकलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.