पंढरपूर वारी: खासदार लंके यांच्याकडून वारकऱ्यांसाठी २ लाख वडापावचे नियोजन!
पारनेर: पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा सेवाभावी संघटना सज्ज झाली आहे. येत्या २ ते ४ जुलै दरम्यान, टेंभुर्णी ते पंढरपूर मार्गावरील परिते (तालुका माढा) येथे तब्बल दोन लाख गरमागरम वडापावसह कुरकुरीत भजी, चहा, बिस्किट आणि बाटलीबंद पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम
गेल्या काही वर्षांपासून खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने नीलेश लंके प्रतिष्ठान वारकऱ्यांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहे. यामध्ये प्रतिष्ठानच्या आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. तसेच, खा. लंके यांच्या सूचनेनुसार पारनेर बाजार समितीने वारकऱ्यांच्या पावसापासून संरक्षणासाठी रेनकोटचे वाटप केले आहे.
भव्य तयारी: २ लाख वडापाव आणि बरंच काही!
परिते येथे अल्पोपहार वितरणासाठी खास पत्र्याचे छत असलेल्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. येथे एकाच वेळी ८ भट्ट्यांद्वारे चहा, गरम बटाटा वडे आणि कांदा भजी तयार केली जाणार आहेत. या कामासाठी २५ आचारी तैनात असतील, तर खासदार नीलेश लंके यांचे ५०० स्वयंसेवक अल्पोपहार वितरणासाठी हजर राहणार आहेत. दोन लाख पाणी बॉटल्स आणि दोन लाख पावांचेही तीन दिवसांसाठी नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्वयंसेवकांसाठी भोजनाचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.
खा. लंके यांची उपस्थिती आणि पाहणी
अल्पोपहार वितरणासाठी परिते येथे सुरू असलेल्या मंडप उभारणीच्या कामाची खासदार लंके यांनी स्वतः पाहणी केली. नियोजनात काही त्रुटी आहेत का, याची माहिती त्यांनी घेतली. विविध दानशूर व्यक्तींनी देणगी तसेच वस्तूंच्या स्वरूपात या उपक्रमासाठी योगदान दिले आहे. २ ते ४ जुलै दरम्यान खासदार लंके हे स्वतः परिते येथे उपस्थित राहून वारकऱ्यांची सेवा करणार आहेत.
दिंडी चालकांचा सन्मान आणि वारकऱ्यांची पसंती
पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केल्यानंतर, त्या-त्या दिंडीतील दिंडी चालकाचा नीलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा संघटनेच्या वतीने खासदार नीलेश लंके स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करणार आहेत.
दिंडीदरम्यान गावोगावी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध प्रकारचे जेवण आणि अल्पोपहार आयोजित केले जातात. मात्र, नीलेश लंके प्रतिष्ठानकडून मिळणाऱ्या गरमागरम वडापाव, भजी, चहा आणि बिस्किटला वारकरी विशेष पसंती देतात आणि आवर्जून त्याचा आस्वाद घेतात.
लंके यांचे आकर्षण आणि स्थानिकांचा सहभाग
आपल्या खास शैलीमुळे राज्यातच नव्हे तर देशभरात नावारूपास आलेल्या खासदार नीलेश लंके यांचेही वारकऱ्यांना मोठे आकर्षण असते. परिते येथे आल्यानंतर अल्पोपहाराअगोदर वारकरी खा. लंके यांना गराडा घालून त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोहही त्यांना आवरता येत नाही. खा. लंकेही वारकऱ्यांसाठी वेळ देत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात आणि सेल्फी काढून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतात.
खा. नीलेश लंके यांचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील त्यांचे चाहतेही या उपक्रमात सहभागी होऊन स्वयंसेवकाची भूमिका पार पाडतात, तसेच आर्थिक आणि वस्तूंच्या रूपात योगदान देतात.